पुढारी ऑनलाईन डेस्क : प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शाळेत भाषण करताना कार्तिक ऊर्फ भोर्याने लोकशाहीची व्याख्या सांगून प्रेक्षकांची मने जिंकली होती. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राज्यभर त्याच्या भाषणाची चर्चा झाली. आज (दि.२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाटूर (ता. परतूर) येथे जाऊन त्याची भेट घेऊन त्याचे कौतुक केले. कार्तिक ऊर्फ भोर्या रेवलगाव (ता.अंबड जि. जालना) येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत आहे.(Karthik Wazir)
अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणारा कार्तिक उर्फ भोर्या जालिंदर वजीर याने प्रजासत्ताक दिनी केलेले भाषण सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले. पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या भोऱ्याने देशातील लोकशाही आपल्या आगळ्या वेगळ्या शैलीत सांगितल्यानंतर त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव झाला. लोकशाहीवरील त्याच्या विनोदी भाषणाचा व्हिडिओ राम भोंडवे यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्याचे भाषण पाहिले. त्यानंतर थेट मुख्यमंत्र्याचे स्वीय सहाय्यक यांनी व्हिडिओ कॉलद्वारे त्याच्याशी संवाद साधला. मुख्यमंत्री यांनी भोर्या व त्याचे वडील यांना 2 फेब्रुवारीला वाटूर फाटा येथे भेटायला येण्याचे निमंत्रण दिले होते. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जालिंदर वजीर यांना दोन मुले व एक मुलगी आहे. कार्तिक हा घरातील सर्वांचा लाडका आहे. त्याच्या या भाषणामुळे तो राज्यभर प्रसिद्ध झाला आहे.
डोळ्यांच्या उपचारासाठी आणि शिक्षणासाठी शासकिय मदत
आज (दि.२) वाटुर येथे झालेल्या आर्ट ऑफ लिविंग च्या जलतारा या शेतकरी मेळाव्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्तिक उर्फ भोऱ्याची भेट घेऊन कौतुक केले. आस्थाविकपणे चर्चा व विचारपुस केली. तसेच कार्तिकच्या डोळ्याच्या उपचारासाठी उद्या तात्काळ मुंबईला बोलावल आहे. त्याचबरोबर त्याला उपचारासह शिक्षणासाठी शासकिय मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. या भेटी दरम्यान त्यांनी स्थानिक नेत्यांची भेट घेतली. यावेळी मा. मंञी अर्जुन खोतकर, बबनराव लोणीकर, बाळासाहेबांची शिवसेना मराठवाडा वैद्यकीय मदतकक्षाचे मंगेश चिवटे, दादासाहेब थेटे, कार्तिकचे वडील जालिंदर वजीर, वर्गशिक्षक भरत मस्के, आजोबा अंबादास वजीर, चुलते दत्ता वजीर आदीउपस्थित होते.
Karthik Wazir : काय होतं भोऱ्याचं भाषण
मला लोकशाही खूप आवडते. या लोकशाहीमध्ये तुम्ही काहीही करु शकता. भांडू शकता, दोस्ती करु शकता. प्रेमाने राहू शकता. मला तर मोक्कार दंगा करायला, खोड्या काढायला, रानात फिरायला, माकडासारखं झाडावर चढायला खूप आवडते. असं केल्यामुळे मला माझे बाबा मारत नाहीत. कारण ते लोकशाही मानतात. पण माझ्या गावातली बारकाली पोरं माझं नाव सरांना सांगतात. तर मग लोकशाहीतील आतंकवादी पोर कशी तुडवली जातात तसं शिक्षक आतंकवाद्यांसारखं मला पायदळी तुडवतात. कधी कधी कोंबडा करायला लावतात. आणि म्हणतात भोऱ्या तुझं वागणं लोकशाहीला धरून नाही.
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.
'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.
Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.