पिंपरी : ई गव्हर्नन्समध्ये महापालिका राज्यात प्रथम | पुढारी

पिंपरी : ई गव्हर्नन्समध्ये महापालिका राज्यात प्रथम

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा :  पॉलिसी रिसर्च ऑर्गनायझेशनतर्फे दरवर्षी राज्यातील महापालिकांच्या संकेतस्थळाचा (वेबसाईट) अभ्यास केला जातो. त्याद्वारे सेवा, पारदर्शकता व उपलब्धता या तीन निकर्षावर महापालिकांच्या ई-गव्हर्नन्स निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. त्यात सलग दुसर्‍या वर्षी पिंपरी-चिंचवड महापालिकेने राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. महापालिका व नागरिक यांच्यामध्ये डिजिटल क्रांतिद्वारे संवाद साधण्यासाठी तसेच, शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या पातळीवर ई-गव्हर्नन्स अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्रशासन धोरणे व प्रश्न याचा अभ्यास करून विश्लेषण केले जाते.

या संस्थेतर्फे दरवर्षी राज्यातील पालिकांच्या ई-गव्हर्नन्सचा आढावा घेतला जातो. सर्वेक्षणात राज्यातील 27 महापालिकेतील सेवा, पारदर्शकता, उपलब्धता, अधिकृत सरकारी संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप तसेच, सोशल मीडिया हॅडेल्स आदींचा अभ्यास करून विविध निर्देशांकाद्वारे प्रसिद्ध करण्यात आला आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेने 10 पैकी 6.23 गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे.
पालिकेचे संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप व सोशल मीडिया या तिन्ही आघाड्यांवर स्वतंत्रपणे मूल्यमापन केले गेले. पालिकेने या सर्व आघाड्यांवर उत्तम गुण मिळविले. उपलब्धता, सेवा व पारदर्शकता यामध्ये संकेतस्थळ व मोबाईल अ‍ॅप यांची उत्तम कामगिरी राहिली. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका प्रशासन कामकाज करीत आहे. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, सहायक आयुक्त बाळासाहेब खांडेकर व मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण हे अधिकारी व त्यांचे पथक काम करीत आहे.

पालिका संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅपचा वापर
महापालिकेच्या विविध विभागांमध्ये ई-गव्हर्नन्स कामाचा वापर केला जात आहे. नागरिकांसाठी संकेतस्थळ, मोबाईल अ‍ॅप व सोशल मीडिया या विविध प्लॅटफॉर्मवर पालिकेच्या विविध सेवांचा लाभ नागरिकांना दिला जात आहे. नागरिक त्या माध्यमातून आपले मत, सूचना, तक्रारी व समस्या मांडत आहेत, असे महापालिका आयुक्त तथा शेखर सिंह यांनी सांगितले.

Back to top button