Latest

Kapil Dev : कार्तिकच्या कौतुकाचे गोडवे गात कपिल देव ऋषभ पंतवर भडकले, म्हणाले…

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीम इंडियाची युवा ब्रिगेड सध्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका खेळत आहे. भारतीय संघ मालिकेत 1-2 ने पिछाडीवर असला तरी या मालिकेकडे टी-20 विश्वचषक स्पर्धेची तयारी म्हणून पाहिले जात आहे. दरम्यान, माजी कर्णधार कपिल देव (kapil dev) यांनी युवा खेळाडूंवर भाष्य केले आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. केएल राहुलच्या दुखापतीनंतर या मालिकेसाठी टीम इंडियाच्या कर्णधार पदाची जबाबदारी त्याच्याकडे सोपवण्यात आली. सलग दोन सामने गमावल्यानंतर संघाने तिसऱ्या सामन्यात विजय मिळवून पुनरागमन केले मात्र कर्णधार पंतच्या कामगिरीत कोणतीही सुधारणा झाली नाही. याबाबत माजी दिग्गज कपिल देव (kapil dev) चांगलेच संतापले आहेत. त्यांनी त्याला विश्वचषकातील यष्टीरक्षकांच्या यादीतूनही वगळले आहे.

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा ऋषभ पंत आतापर्यंत टी-20 मध्ये स्वत:ला सिद्ध करू शकलेला नाही. लागोपाठ संधी मिळूनही तो धावा करण्यात अपयशी ठरला आहे. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर टीम इंडियाची वाटचाल सुरू असून यष्टिरक्षकाची जागा ही सर्वांच्याच नजरेत आहे. ऋषभ पंत, संजू सॅमसन, इशान किशन आणि आता दिनेश कार्तिक यांनीही या जागेसाठी दावा ठोकला आहे.

विश्वचषक विजेते माजी कर्णधार कपिल देव (kapil dev) यांनी म्हटले की, दिनेश कार्तिक, इशान किशन आणि संजू सॅमसन हे जवळजवळ समान पातळीचे आहेत. मला या तिघांमध्ये फारसा फरक दिसत नाही. पण फलंदाजीच्या बाबतीत प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा खूपच सरस दिसतो.

हे तिघेही स्वबळावर भारतीय संघाला सामने जिंकू देऊ शकतात. ऋद्धिमान साहाबद्दल बोलायचे झाले तर तो तिघांपेक्षाही सरस आहे, पण नंतर फलंदाजीचा विचार केला तर इतर ते तिघेही त्याच्यापेक्षा सरस आहेत. संजू सॅमसनबद्दल मी खूप निराश आहे. तो खूप प्रतिभावान आहे पण हा खेळाडू दोन सामन्यांमध्ये धावा करतो आणि नंतर अपयशी ठरतो. त्यांच्यात सातत्य अजिबात नाही.

दुसरीकडे कपिल देव यांनी दिनेश कार्तिकचे जोरदार कौतुक केले आहे. आयपीएल आणि द. आफ्रिकेविरुद्धच्या टी 20 मालिकेतील कामगिरीबद्दल कार्तिक कौतुकास पात्र आहे, असे त्यांने म्हटले आहे. दिनेशने या आयपीएलमध्ये इतकी चांगली कामगिरी केली आहे की, निवडकर्त्यांना त्याने आपली दखल घेण्यास भाग पाडले. ऋषभ पंत हा तरुण खेळाडू आहे, त्याच्याकडे भरपूर क्रिकेट आहे. दिनेश कार्तिककडे अनुभव आहे आणि कामगिरी, म्हणूनच त्याचे कौतुक करावे तितके कमी आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT