दिनेश कार्तिकला का खेळवले जाते?, गौतम गंभीरचा सवाल | पुढारी

दिनेश कार्तिकला का खेळवले जाते?, गौतम गंभीरचा सवाल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था :  विराट कोहली, रोहित शर्मा, के. एल. राहुल हे आघाडीचे फलंदाज संघात परतले की, दिनेश कार्तिकला संघातून बाहेर व्हावे लागेल, त्यामुळे त्याला आता वर्ल्डकपच्या संभाव्य संघात कशासाठी खेळवले जात आहे, असा सवाल भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याने केला आहे. संघातील सातव्या क्रमांकावर अष्टपैलू खेळाडूचा शोध सुरू असताना दीपक हुडा, अक्षर पटेल हे त्यासाठी योग्य पर्याय आहेत. कार्तिकला तेथे खेळवून उपयोग नाही, असेही तो म्हणाला.

इंडियन प्रीमिअर लीग 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाकडून खेळताना दिनेश कार्तिकने उल्लेखनीय कामगिरी करून टीम इंडियाच्या निवड समितीला पुन्हा एकदा त्याचा विचार करण्यास भाग पाडले. त्यामुळेच सध्या सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतून त्याने 2019 नंतर टीम इंडियात पुनरागमन केले. या त्याच्या कामगिरीमुळे आगामी ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेसाठी कार्तिक संघात हवा, अशी मागणी अनेकजण करत आहेत; पण भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीर याला तसे वाटत नाही.

गंभीरने ऑस्ट्रेलियात होणार्‍या ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियात स्थान टिकवणे कार्तिकसाठी अवघड असल्याचे म्हटले आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्डकप स्पर्धेत कार्तिकची संघात निवड व्हायला हवी का, याबाबत गंभीरला विचारण्यात आले. लोकेश राहुल, विराट कोहली, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आदी खेळाडूंच्या पुनरागमनानंतर कार्तिकचे संघात स्थान टिकवणे अवघड होणार असल्याचे गंभीर म्हणाला.

ट्वेंटी-20 वर्ल्डकप अजून दूर आहे आणि आताच त्याबाबत सांगणे घाईचे ठरेल. कार्तिकला सातत्य राखायला हवे; परंतु जर त्याला केवळ अखेरची तीन षटकेच फलंदाजी करायची असेल, तर परिस्थिती आव्हानात्मक बनेल. सातव्या क्रमांकावर खेळणार्‍या खेळाडूच्या शोधात भारतीय संघ आहे आणि जर अक्षर सातव्या क्रमांकावर खेळला, तर भारताला एक फलंदाज कमी खेळवावा लागेल, असे गंभीर म्हणाला. असे असेल तर मी वर्ल्डकप संघासाठी कार्तिकचा विचार करणार नाही. मला त्यापेक्षा ऋषभ पंत आणि दीपक हुडा यांना संघात पाहायला आवडेल. जर त्याला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान मिळणार नसेल, तर त्याची आतापासून संघात निवड करण्यात काहीच अर्थ नाही, असे गंभीरने स्पष्ट केले.

Back to top button