पुढारी ऑनलाईन: काही दिवसांपासून अवकाशातील पश्चिमेकडील बाजूस नवीन खगोलीय घटना घडत आहेत. नुकतीच २२ फेब्रुवारी दरम्यान सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह गुरू आणि सगळ्यात तेजस्वी ग्रह शुक्र यांच्यात अनोखा संयोग दिसून आला. ही खगोलीय घटना संपूर्ण जगाने अनुभवली होती. यानंतर पुन्हा १ मार्चला गुरू आणि शुक्र या दोन्ही ग्रहातील अंतर आणखी कमी होणार असल्याने पुन्हा या दोन्हीमध्ये अनोखा संयोग खगोलप्रेमींना अनुभवायला मिळणार आहे. ही खगोलीय घटना जगभरात अनुभवायला येणार असल्याची माहिती अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
२२ फेब्रुवारी रोजी गुरू आणि शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांजवळ आलेले दिसले. या दोन्ही ग्रहांच्यामध्ये चंद्रकोर पाहायला मिळाली होती. अनेक खगोलशास्त्रज्ञांनी यासंदर्भातील माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती. त्यामुळे ग्रहांच्या संयोगाचे हे सुंदर आणि नयनरम्य दृश्य खगोलीयदृष्ट्या ही अत्यंत महत्त्वपूर्ण घटना असल्याचे मानले जाते.
गुरू अन् शुक्र हे दोन्ही ग्रह एकमेकांपासून कित्येक अंतरावर वेगळे झालेले दिसत होते. मात्र, आता त्यांच्यातील अंतर रोज रात्री कमी होऊ लागले आहे. 20 फेब्रुवारीपर्यंत दोन ग्रहांमधील अंतर नऊ अंशांपेक्षा थोडे अधिक होते. 27 फेब्रुवारी रोजी हे अंतर केवळ 2.3 अंशांपर्यंत कमी होईल. त्यानंतर बुधवारी (1 मार्च) संध्याकाळी हे दोन्ही एकमेकांच्या खूप जवळ येतील. या दोन्ही ग्रहातील अंतर हे फक्त 0.52 अंश इतके असणार आहे, यामुळे गुरू हा ग्रह -2.1 तीव्रतेने चमकेल तर शुक्र -4.0 तीव्रतेने चमकताना दिसणार आहे. या दोन्ही ग्रहामध्ये चंद्राचा देखील समावेश असणार आहे. दरम्यान चंद्रावरदेखील चमक आल्याचे दृश्य अवकाशात दिसणार असल्याचे Space.com ने दिलेल्या अहवालात म्हटले आहे. खगोलप्रेमींसाठी अवकाशातील हा अनोखा संयोग पर्वणी ठरणार आहे.