

वॉशिंग्टन : माणूस जिथे जिथे गेला तिथे त्याने कचरा निर्माण करून ठेवला. मग ते एव्हरेस्टसारखे सर्वात उंच शिखर असो किंवा समुद्राचा अथांग खोलीवर असलेला तळ. अगदी अंतराळातही माणसाने निर्माण केलेला कचरा आहेच. रॉकेट, अंतराळयानाचे भाग, निकामी झालेले सॅटेलाईटस् यासारखा अनेक प्रकारचा कचरा अत्यंत वेगाने पृथ्वीभोवती घिरट्या घालत आहे. त्याचा धोका भविष्यातील अंतराळ मोहिमा, अंतराळयाने किंवा सॅटेलाईटस्ना आहेच, शिवाय या कचर्यामुळे पृथ्वीजवळ एलियन येऊन गेल्याचेही कळणार नाही असे संशोधकांना वाटते!
या दशकाच्या अखेरपर्यंत रात्रीच्या आकाशातील तारे निकामी सॅटेलाईटस् व तत्सम अवकाशीय कचर्याने झाकोळून जाईल अशी भीतीही संशोधकांना वाटत आहे. एलियन म्हणजेच परग्रहवासीयांच्या शोधकार्यातही हा कचरा अडथळा निर्माण करू शकतो. 'द इंडिपेंडंट'मध्ये याबाबतचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यामध्ये म्हटले आहे की 2019 च्या तुलनेत अवकाशात सॅटेलाईटस्ची संख्या चारपटीने वाढली आहे. सध्या 8 हजारपेक्षाही अधिक उपकरणे पृथ्वीभोवती फिरत आहेत. एलन मस्क यांच्या 'स्पेस एक्स'ने तर 'स्टारलिंक' योजनेत हजारो सॅटेलाईटस् अंतराळात सोडण्याची योजना आखलेली आहे. 44 हजार सॅटेलाईटस्चे जाळे अंतराळात निर्माण करण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा आहे. कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीतील टोनी टायसन यांनी म्हटले आहे की 2030 पर्यंत पृथ्वीचे आकाश अशा सॅटेलाईटस्नी झाकोळून जाऊ शकते. गेल्याच आठवड्यात बि—टनमधील रॉयल अॅस्ट्रॉनॉमिकल सोसायटीसारख्या काही संस्थांनी यावर लगाम घालणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.