Latest

पुणे : सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना केंद्रात महानिरीक्षकपदी बढती

अनुराधा कोरवी

पुणे, पुढारी वृत्तसेवा : पुणे शहर पोलीस दलातील सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांना केंद्रात महानिरीक्षकपदी (आयजी) आणि सहसचिवपदी पदोन्नती मिळाली आहे. नुकतीच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने याला मान्यता दिली आहे.

देशातील काही मोजक्या अधिकाऱ्यांची निवड होते. आयपीएस व 'आयएएस'मध्ये अशी निवड होणे हे मोठा बहुमान समजला जातो. मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने २००२ तुकडीच्या 'इंडियन पोलीस सर्व्हिस' (आयपीएस) अधिकारी आणि अतिरिक्त आयुक्त पदावरील देशभरातल्या २३ अधिकाऱ्यांना पदोन्नती दिली. त्यात महाराष्ट्रातून डॉ. रवींद्र शिसवे हे एकमेव आहेत.

डॉ. शिसवे हे ठाणे जिल्ह्यातील कल्याणजवळच्या आपटी गावचे मूळ रहिवासी आहेत. बेळगावमधून वैद्यकी पदवी घेतल्यानंतर शहापूर तालुक्यातील डोळखांब प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य अधिकारी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्यानंतर त्यांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास सुरू केला. २००२ मध्ये आयपीएस बॅचमध्ये निवड झालेले ते महाराष्ट्रातील एकमेव अधिकारी होते.

प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांनी सांगलीमध्ये अशोक कामठे यांच्या मार्गदर्शनाखाली काम केले. त्यानंतर गडचिरोली, गोंदिया, सिंधुदुर्ग, बुलडाणा त्यानंतर सांगली पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिले आहे. मुंबई परिक्षेत्र एकचे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांनी दीर्घकाळ काम पाहिले. मराठा मोर्चाच्या काळात मुंबईत शांतता ठेवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मार्च २०१९ मध्ये त्यांची पुणे शहर पोलीस दलात सहपोलीस आयुक्त म्हणून बढतीवर नियुक्ती झाली.

दरम्यान, कोरोनाकाळात त्यांनी नागरिकांबरोबर पोलिसांना दिलासा देणारे निर्णय घेतले. राज्यातील सर्व पोलीस दलाला मार्गदर्शक होईल, अशी कोरोनाविषयक नियमावली तयार करण्याचे काम डॉ. शिसवे यांनी केले होते. कोरोनाच्या काळात पुणे शहर पोलीस दलाचा डॉ. शिसवे हे चेहरा बनले होते. डॉ. शिसवे यांच्या आतापर्यंतच्या सेवा कार्यावर केंद्र शासनानेही मान्यतेची मोहर उमटवून त्यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीबद्दल २६ जानेवारी २०२१ ला राष्ट्रपती पदकाने सन्मानित केले आहे.

"प्रामाणिकपणे मूल्यांची कास धरून काम करताना अशा प्रकारे बहुमान मिळतो तेव्हा काम करण्यास नवीन ऊर्जा मिळते. पुणे शहरात मनापासून काम करताना राष्ट्रपती पदक, पोलीस महासंचालकाचे सन्मानचिन्ह आणि आता हा बहुमान मिळाल्याने पुणे शहर व पुणेकर कायमच स्मरणात राहतील. यापुढेही पुणेकरांच्या सेवेसाठी उत्साहाने काम करण्यास तयार आहे."
-डॉ. रवींद्र शिसवे, सहपोलीस आयुक्त

हेही वाचलंत का? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT