पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय महिला संघाची महान वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. भारत आणि इंग्लंड महिला संघ यांच्यातील तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्स मैदानावर होणार आहे. झुलनच्या कारकिर्दीतील हा शेवटचा सामना असेल. झुलन महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज आहे. तिने सर्व फॉरमॅटमध्ये मिळून 352 विकेट घेतल्या आहेत. (IND W vs ENG W)
39 वर्षीय झुलनची इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. झुलन राष्ट्रकुल स्पर्धेमध्ये टी-20 संघात नव्हती. तसेच श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही झुलनला भारतीय संघात स्थान देण्यात आले नव्हते. वृत्तानुसार, झुलनने युवा खेळाडूंना संधी देण्यासाठी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. (IND W vs ENG W)
न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत झुलनने भारताकडून शेवटचा सामना खेळला होता. बीसीसीआयला या विश्वचषकादरम्यान झुलनला निरोप द्यायचा होता, पण दुखापतीमुळे ती दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या गट सामन्यात खेळू शकली नव्हती. २०१८ मध्ये तिने शेवटचा टी-20 सामना खेळला होता.तसेच तिने कारकिर्दीतील शेवटचा कसोटी सामना ऑक्टोबर २०२१ मध्ये खेळला होता.
झुलनला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत संधी दिली जाणार होती. परंतु, ती मालिकेसाठी पूर्णपणे तंदुरुस्त नव्हती. राष्ट्रकुल स्पर्धेचे सामने टी-२० फॉरमॅटमध्ये होणार होते आणि झुलन आता या फॉरमॅटमध्ये खेळू शकत नव्हती. त्यामुळे तिला इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत संधी देण्यात आली आहे.
वृत्तानुसार, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर झुलन आयपीएलमध्ये खेळू शकते. महिला आयपीएल मार्च २०२३ मध्ये सुरू होणार आहे आणि झुलन या स्पर्धेत दिसू शकते. याशिवाय मेंटॉरच्या भूमिकेसाठी पुरुषांच्या आयपीएल टीमसोबतही ती दिसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
झुलन गोस्वामीने 2002 मध्ये आपल्या करिअरला सुरुवात केली होती. त्यावेळी ती अवघ्या १९ वर्षांची होती. आपल्या कारकिर्दीत त्यांनी जवळपास दोन दशके भारताची सेवा केली. तिने देशासाठी १२ कसोटी, ६८ टी-२० आणि २०१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. ती एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी महिला गोलंदाज आहे. तिने २५२ विकेट घेतल्या आहेत.ती सहा महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळली आहे.
इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ १०, १३ आणि १५ सप्टेंबर रोजी तीन टी-२० सामने खेळणार आहे. यानंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकाही खेळवली जाणार आहे. या मालिकेला १८ सप्टेंबरला सुरुवात होणार असून दुसरा सामना २१ सप्टेंबरला आणि तिसरा सामना २४ सप्टेंबरला होणार आहे.