आदिवासी भागामधील 15 गावे होणार ‘रिचेबल’; आंबेगाव तालुक्यात बीएसएनएलकडून मोबाईल टॉवर मंजूर | पुढारी

आदिवासी भागामधील 15 गावे होणार ‘रिचेबल’; आंबेगाव तालुक्यात बीएसएनएलकडून मोबाईल टॉवर मंजूर

भिमाशंकर; पुढारी वृत्तसेवा: आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पंधरा गावांसाठी बीएसएनएल कंपनीचे मोबाईल टॉवर मंजूर झाले आहे. यामुळे दुर्गम भागातील या गावांमध्ये आता लवकरच मोबाईल रेंज उपलब्ध होणार आहे. वर्षानुवर्षे ‘नॉट रिचेबल’ असणार्‍या तालुक्यातील या गावांत अजूनही मोबाईल रेंज मिळत नाही. या भागात बीएसएनएल कंपनीने टॉवर उभारावेत, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून परिसरातील लोकांकडून होत होती. त्यानुसार राज्याचे माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी संबंधित विभागाला सर्व्हे करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

बीएसएनएल कंपनीने केलेल्या सर्व्हेनुसार तालुक्याच्या दुर्गम भागातील साकेरी, मेघोली, नांदूरकीची वाडी, फुलवडे, पिंपरी, सावारली, कुशिरे बुद्रुक, पाटण, न्हावेड, बोरघर, तिरपाड, आघाने, पिंपरगणे, म्हाळुंगे तर्फे आंबेगाव आणि आहुपे गावांसाठी बीएसएनएल कंपनीचे एकूण पंधरा टॉवर मंजूर करण्यात झाले आहेत.

टॉवर उभारण्याचे काम एप्रिल 2023 अखेरपर्यंत पूर्ण होणार असून, संबंधित गावच्या ग्रामपंचायतीने योग्य जागा उपलब्ध करून देण्याचे आवाहन माजी पंचायत समिती सभापती संजय गवारी यांनी केले आहे. ज्या गावांमध्ये जागा उपलब्ध होतील, त्या ठिकाणी टॉवर उभारणीची कामे लगेच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बीएसएनएल कंपनीकडून देण्यात आली आहे.

Back to top button