

रेणापूर, पुढारी वृत्तसेवा : पैसे देणे – घेण्याच्या वादातून एका 49 वर्षीय व्यक्तीचे पाय बांधून आंब्याच्या झाडाला लटकवून गळफास दिल्याची घटना रेणापूर -राजेवाडी व महापूर शिवारालगतच्या गुरुवारी (दि.18) दुपारी बारा वाजता उघडकीस आली. मृताची ओळख पटली असून बाळासाहेब नरसिंग कांबळे असे त्याचे नाव असून तो लातुरातील सुभेदार रामजी नगरातील रहिवाशी होता. त्याच्या मुलाने दिलेल्या फिर्यादीवरून रेणापूर पोलिसांनी महापूर येथील एका व्यक्तीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेबाबत पोलिस सूत्राकडून मिळाली माहिती अशी की, बाळासाहेब नरसिंग कांबळे (वय 49 ) हे काही दिवसांपासून ते फायनान्सचा व्यवसाय करीत होते. त्यांनी महापूर येथील रमेश राजे यांच्या मध्यस्थीने शेती घेतल्याचे समजते. त्यानंतर लातुरात घर घेण्यासाठी बाळासाहेब कांबळे यांनी रमेश राजे यांना कांही रुपये दिले होते. परंतु तो घर घेऊन देत नसल्याने दिलेल्या पैशाची मागणी करण्यात येत होती. दरम्यान, बुधवारी (दि. 17) रात्री सात वाजण्याच्या सुमारास बाळासाहेब कांबळे हे लातूर येथून घराबाहेर पडले ते परत आले नव्हते. दुसर्या दिवशी रेणापूर -राजेवाडी व महापूर शिवारात कॅनलच्या बाजूला एका शेतातील आंब्याच्या झाडावर संशयितरीत्या त्यांचे प्रेत लटकत असल्याचे एका अज्ञात व्यक्तीकडून रेणापूर पोलिसांना समजले. पोलिसांनी परिसराची पाहणी केली असता त्यांना घटनास्थळी काही संशयास्पद वस्तू (पाण्याच्या बाटल्या व दारूच्या 11 रिकाम्या बाटल्या आढळल्या. पाय बांधलेले शव आंब्याच्या झाडावर लटकवल्याचे दिसून आले. घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांनी श्वानपथक व ठसे तंज्ञाना पाचारण केले होते. मृताची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचा वापर केला. त्यानंतर सदर मृताची ओळख पटली. नंतर पोलिसांनी मृताच्या नातेवाईकांना घटनास्थळी बोलावून घेतले. पंचनामा केला. त्यात मृताच्या अंगावर लाल मिरचीपूड टाकलेली व त्यांना मारहाण झाल्याचे पोलिसांना दिसून आले. या संदर्भात मृत बाळासाहेब कांबळे यांचा मुलगा बुद्धभूषण बाळासाहेब कांबळे याने आपल्या वडिलांचा घातपात झाल्याचा संशय व्यक्त करून फिर्याद दिली. चाकूर-रेणापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी निकेतन कदम हे अधिक तपास करीत आहेत.