Latest

Jaydev Unadkat : 12 वर्षांनी पुनरागमन करणा-या जयदेव उनाडकटच्या नावावर दोन विक्रमांची नोंद

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यासाठी जयदेव उनाडकटचा (Jaydev Unadkat) भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. तब्बल 12 वर्षांनंतर त्याचे भारताच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. कुलदीप यादवच्या जागी उनाडकटला संघात संधी देण्यात आली. मालिकेतील पहिल्या सामन्यात कुलदीपने फिरकीची जादू दाखवत चमकदार कामगिरी केली होती. त्याने पहिल्या डावात पाच आणि एकूण सामन्यात आठ विकेट्स पटकावल्या. तो सामनावीर ठरला, पण दुस-या कसोतीतून त्याला डच्चू देत त्याच्या जागी उनाडकटला प्राधान्य देण्यात आले.

उनाडकटने (Jaydev Unadkat) 12 वर्षांपूर्वी भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. 2010 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली त्याने द. आफ्रिकेत पहिला सामना खेळला होता. यावेळी त्यांचे वय अवघे 19 ​​वर्षे होते. मात्र, उनाडकट या सामन्यात एकही विकेट मिळवू शकला नव्हता. त्या कसोटीत यजमान संघाने भारतीय संघाचा एक डाव आणि 25 धावांनी पराभव केला होता.

12 वर्षांत अनेक बदल…

जयदेव उनाडकटच्या (Jaydev Unadkat) पहिल्या कसोटी सामन्यात वीरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, सुरेश रैना, एमएस धोनी (कर्णधार आणि विकेटकीपर), हरभजन सिंग, इशांत शर्मा, एस श्रीशांत यांचा समावेश होता. त्यानंतर आज त्याच्या दुसऱ्या कसोटीदरम्यान भारतीय संघ पूर्णपणे बदलला. धोनी निवृत्त झाला आहे. तर राहुल द्रविड आता भारतीय संघाचा प्रशिक्षक आहे. इशांत शर्मा वगळता त्या जुन्या संघातील सर्व खेळाडू निवृत्त झाले आहेत. इशांत निवृत्त झाला नसला तरी तो संघाबाहेर आहे आणि त्याच्या पुनरागमनाची शक्यता कमी आहे. आता उनाडकटच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात केएल राहुल (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, उमेश यादव, मोहम्मद सिराज हे त्याचे सहकारी आहेत.

उनाडकटचे पदार्पण विराटच्या आधी (Jaydev Unadkat)

जयदेव उनाडकटने विराट कोहलीच्याही आधी भारताकडून कसोटी पदार्पण केले होते. त्यानंतर विराट भारताच्या कसोटी संघात आला आणि शानदार फलंदाजी करत अनेक विक्रम केले. तसेच संघाचा कर्णधारही बनला आणि परदेशात अनेक कसोटी मालिका जिंकल्या. तो भारताचा सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार ठरला. आता त्यानेही तिन्ही संघाच्या कर्णधारपदाचा राजिनामा दिला असून तो एक फलंदाज म्हणून भारतीय कसोटी संघाचा भाग आहे.

प्रदीर्घ काळानंतर भारताच्या कसोटी संघात पुनरागमन करणारा तो दुसरा खेळाडू आहे. लाला अमरनाथ या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहेत. अमरनाथ यांनी 12 वर्षे 129 दिवसांनी कसोटी भारतीय कसोटीत पुनरागमन केले होते. तर, उनाडकट 12 वर्षे आणि दोन दिवसांच्या कालावधीनंतर कसोटी संघात परतला आहे. तर दोन कसोटींमध्ये सर्वाधिक सामने बाहेर राहणा-या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. यात, गॅरेथ बॅटी पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या पहिल्या आणि दुस-या कसोटीत तब्बल तब्बल 142 सामन्यांचे अंतर आहे. त्याचबरोबर उनाडकटने 118 सामन्यांनंतर पुनरागमन केले आहे.

पहिल्या ते दुस-या कसोटीदरम्यान सर्वाधिक सामने बाहेर राहणारे खेळाडू

गॅरेथ बॅटी 2005-16 : 142 सामने
जयदेव उनाडकट 2010-22* : 118 सामने
मार्टिन बिकनेल 1993-03 : 114 सामने
फ्लाइट रेफर 1999-09 : 109 सामने
युनूस अहमद 1969-87 : 104 सामने
डेरेक शॅकलटन 1951-63 : 103 सामने

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT