पाऊस आला तरी तुम्ही जागेवरचे उठू नका, शरद पवार यांच्याप्रमाणे मी जागेवर भिजत उभा राहून बोलत राहीन. तेव्हा 2024 ला तुम्ही निवडून द्याल, असे मिश्कीलपणे म्हणत करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी देवळाली येथील कार्यक्रमात जोरदार फटकेबाजी केली. देवळालीचे सरपंच आशिष गायकवाड यांनी आमदार संजय शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार जगताप होते. सर्वात शेवटी जगताप यांचे भाषण झाले. या कार्यक्रमात अनेक नेत्यांच्या भाषणात पाणी हाच महत्वाचा मुद्दा होता. रस्ते, वीज हेही मुद्दे होतेच. त्यात सर्वात महत्वाचा होता तो पाणी! कार्यक्रम सुरु असताना पावसाचे वातावरण सुरु झाले होते.
माजी आमदार जयवंतराव जगताप बोलायला उभे राहिले तेव्हा विजेचा कडकडाट सुरु झाला होता. त्यामुळे पाऊस येईल असे वातावरण निर्माण झाले होते. तेव्हा माजी आमदार जगताप म्हणाले, 'पाऊस आला तरी तुम्ही जागेवरचे उठू नका, शरद पवारांप्रमाणे मी जागेवर भिजत उभा राहून बोलत राहीन. तेव्हा 2024 ला तुम्ही निवडून द्याल. पाण्यासाठीच येथे तुम्ही बसला आहात ना? मग पाऊस पडू द्या, या वक्तव्यावर उपस्थितांकडून हास्याचा पाऊस पडला.
जगताप म्हणाले, की करमाळ्यातील सर्व गट हे जगतापांपासूनच सुरु झालेले आहेत. आमदारांना कोणती कामे सांगायची, सरपंचाला कोणती कामे सांगायची, पंचायत समितीत कोणती कामे सांगायची याचे भान प्रत्येकांनी ठेवले पाहिजे. विकासाची जबाबदारी आता तुमच्यावर आहे, त्यामुळे तुम्ही ती पार पाडा. मी काय त्यात लक्ष घालणार नाही. विकास हा नेहमी बदलणारा असतो. गरजा ज्याप्रमाणे वाढतात तसाच विकासही सातत्याने करावा लागतो, कितीही विकास केला तरी तो कमीच असतो. मला काय आता मतं मागायची नाहीत, त्यामुळे मी स्पष्ट बोलतो आहे.
आमदार संजय शिंदे भेटत भेटत नाहीत या आरोपाला जगताप यांनी यावेळी उत्तर दिले. ते म्हणाले, शिंदे भेटण्याची वेळ येऊच देणार नाहीत. कारण ते स्वतः विकासकामे करत आहेत. मामांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. एखादे काम हाती घेतले तर ते पूर्ण करतात. रस्ते, वीज, पाणी, आरोग्याचा प्रश्न ते सोडवत आहेत. राजकारणात विकासाला महत्व द्या, असेही जगताप म्हणाले. शेवटी पाऊस नाही याचाही त्यांनी उल्लेख केला.
शरद पवारांची साताऱ्यातील सभा याआधी गाजली होती. धो धो पावसात पवारांनी भिजत सभेत संबोधित केले होते. हाच धागा पकडून करमाळ्याचे माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी कार्यक्रमात संबोधित करताना 'तुम्ही उठू नका, शरद पवारांप्रमाणे मी पावसात भिजतच बोलत राहीन' असे म्हटले.