Latest

Manoj Jarange-Patil: जरांगे-पाटील यांच्या उपोषणाला कुटुंबाचा भक्कम पाठिंबा

अविनाश सुतार

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: मराठा आरक्षणासाठी उपोषणास बसलेले मनोज जरांगे -पाटील (Manoj Jarange-Patil) यांच्या पाठीशी मराठा समाजच नव्हे, तर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय भक्कमपणे उभे आहे. मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत चालल्याने कुटुंबीयांना काळजी वाटत असली तरी त्यांनी मागण्या पूर्ण होइपर्यंत उपोषण सुरुच ठेवावे, असे त्यांच्या पत्नी सुमित्रासह मुलगा शिवराज व मुलगी पल्लवी यांचे मत आहे.

गेल्या आठ दिवसांपासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे- पाटील (Manoj Jarange-Patil) यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत चालली आहे. याबद्दल त्यांच्या कुटुंबीयांना काय वाटते? त्यांनी आंदोलनातून माघार घ्यावी का ? या बाबत त्यांच्या पत्नी सुमित्रा, कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या दुसर्‍या वर्गात शिकणारा शिवराज व मुलगी पल्लवी यांच्याशी 'दै.पुढारी'ने संवाद साधला.

यावेळी सुमित्रा जरांगे म्हणाल्या की, मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्यासाठी त्यांनी उपोषण मागे घ्यावे, असे आम्ही सांगणार नाही. सरकारला जाग येत नाही का? ते झोपलेले आहे का ? आठ दिवसांपासून या माणसाच्या तोंडामध्ये पाण्याचा घोट नाही की पोटात अन्नाचा कण नाही, मग सरकारला कळत नाही का? त्यामुळे आम्ही सांगणार नाही उपोषण मागे घ्या म्हणून. त्यांच्या जीवास काही बरे वाईट झाले, तर त्याला सरकार आणि सरकारच जबाबदार राहील, असा इशारा सुमित्रा यांनी दिला.

शिवराज म्हणाला की, पप्पांची प्रकृती खालावत असल्याने दुःख आहे. परंतु समाजासाठी ते कार्य करतात, याचा खूप अभिमान आहे. वडिलांना आमच्या सर्वांचा पाठिंबा आहे. पप्पाला मी निश्चितपणे सांगतो की, तुम्ही आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेऊ नका. घरच्यांची काळजी करू नका. आमचा पूर्णपणे तुम्हाला पाठिंबा आहे. तुम्ही फक्त लढत रहा. सरकार नेहमीच वेळ मागते. मागे तीन महिन्यांचा वेळ मागितला. आता एक महिन्याचा वेळ मागतेय. एक महिन्याचा वेळ दिला, तरी परत वेळ मागतील आणि आता काय घडलं ते विसरून जातील. त्यामुळे पप्पांनी माघार घेऊ नये. मनोज जरांगे यांची मुलगी पल्लवी हिने पप्पा जिद्दी असल्याचे सांगून ते आरक्षण घेतल्याशिवाय माघार घेणार नाहीत, अशी प्रतिक्रिया दिली.

मनोज जरांगे- पाटील मुळचे बीड जिल्ह्यातील

जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील हे मुळचे बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील मातोरी येथील आहेत. या ठिकाणी त्यांचे जुने घर असून त्यांचे एक भाऊही याच ठिकाणी राहतात. गत काही वर्षांपासून मनोज जरांगे हे शहागडजवळील एका वस्तीवर राहतात. मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी पूर्ण वेळ काम करतात.

कोपर्डी येथील घटनेतील आरोपींना अहमदनगर येथील न्यायालयात आणण्यात आले, त्यावेळी काही तरुणांनी हल्ला केल्याची घटना घडली होती. यात जरांगे यांच्यासह इतर चारजण सहभागी होते. यात त्या तरुणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या खटल्यासाठी लागणारा खर्च करण्यासाठी जरांगे पाटील यांनी आपली दोन एकर जमीन विकली. मनोज जरांगे यांची आर्थिक परिस्थिती बेताचीच असून त्यांची पत्नी मोलमजुरी करुन कुटूंब चालवते. तर जरांगे यांनी पूर्णवेळ समाजकार्यासाठी देण्याचे ठरवले आहे. जंरागे यांनी यापूर्वी साष्टपिंपळगाव, भांबेरी येथेही मराठा आरक्षणप्रश्नी आंदोलन केले आहे. प्रारंभी ते छावा संघटनेत सक्रीय होते त्यानंतर त्यांनी स्वतःची संघटनाही स्थापन केली होती. मातोरी येथे त्यांची काही जमीन असून जुने घर आहे.

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT