जळगाव, पुढारी ऑनलाईन : व्यापाऱ्याला दिलेल्या केळीचे पेमेंट घेऊन घरी परतत असताना भोकर-भादली येथील शेतकऱ्याला अज्ञात पाच हल्लेखोरांनी बेदम मारहाण केली. त्यांच्याकडून ५० हजारांच्या रोकडसह सोन्याचे ब्रेसलेट आणि अंगठी जबरी हिसकावून पोबारा केला. ही घटना मंगळवारी (दि. २८) रोजी सायंकाळी ५ वाजता घडली. जखमी शेतकऱ्यावर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. (Jalgaon News)
आज सकाळी पोलीस जबाब घेण्यासाठी रुग्णालयात गेले आहेत. याबाबत माहिती अशी की, तालुक्यातील भोकर येथील निवृत्ती गंगाराम साळुंखे (वय-३७) हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. निवृत्ती पाटील यांनी केळी किनोद येथील व्यापाऱ्याला विक्री केली होती. केळीचे पैसे घेण्यासाठी दुचाकीने निवृत्ती साळुंखे यांच्यासह गावातील विठू उर्फ प्रकाश यांच्याकडे गेले.
सायंकाळी ५ वाजता किनोद येथे व्यापाऱ्याकडे गेले होते. व्यापाऱ्याकडून ५० हजार रूपयांची रोकड घेऊन ते भोकर भादली आपल्या गावी परतत असताना भोकर ते किनोद रस्त्यावर अज्ञात पाच जणांनी निवृत्ती यांची दुचाकी अडविली. निवृत्ती यांच्याकडे पैशांची मागणी केली असता त्यांच्यात वाद झाला. यात हल्लेखोरांमधील एकाने हातातील काठी निवृत्ती यांच्या डोक्याला मारली त्यात ते जखमी झाले. त्यांच्या खिशातील ५० हजारांची रोकड आणि गळ्यातील दोन तोळ्याची सोन्याची चैन आणि १० ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा मुद्देमाल जबरी हिसकावून पोबारा केला आहे. (Jalgaon News)
जखमी अवस्थेत निवृत्ती यांनी त्यांचे चुलत भाऊ विजय गोपाल पाटील यांना फोनकरून घटनेची माहिती दिली. विजय पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमी निवृत्ती पाटील यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस जबाब घेण्यासाठी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात गेले आहे, यानंतर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.