जळगाव पुढारी वृत्तसेवा : एकीकडे घरात लग्नाची तयारी सुरु होती, सगळीकडे आनंदी आनंद होता. मात्र अशातच जळगाव जिल्ह्यातील पाटील कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तालुक्यातील ममुराबाद येथील १३ वर्षीय मुलाचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे लग्नघरात शोककळा पसरली असून नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
मुकूंदा दामू पाटील रा. ममुराबाद ता. जि. जळगाव हे पत्नी व तीन मुलांसह वास्तव्याला आहे. मुकूंदा पाटील यांचा मोठा भाऊ डिगंबर दामू पाटील यांच्या मुलीचे लग्न असल्याने घरात लग्नाच्या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. रविवारी १७ एप्रिल रोजी मुकूंदा पाटील आणि त्यांची पत्नी दिपाली पाटील हे दोघेजण भावाच्या घरी गेले होते. त्यावेळी त्यांचा मुलगा प्रणव मुकुंदा पाटील (वय १३) रा. ममुराबाद हा घरी एकटाच होता. सकाळी ८ वाजेच्या सुमारास बाथरूममध्ये बादलीत हिटर लावले होते. त्यानंतर बाजूलाच प्रणव आंघोळ करण्यासाठी बसला. अचानक त्याला विद्यूत हिटरचा धक्का लागल्याने प्रणवचा जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, लग्नात आलेले रविंद्र पाटील हे घरी आले असता हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने नातेवाईकांना बोलावून घेतले. मुलाचा मृत्यू झाल्याचे पाहून आईवडीलांनी हंबरडा फोडला. मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आला. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्न घरात शोककळा पसरल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.