Latest

जळगाव : बँक व्यवस्थापकाला पिस्तूलाचा धाक दाखवत पैश्यांची जबरी लूट

गणेश सोनवणे

जळगाव पुढारी वृत्तसेवा : बचत गटाचे पैसे वसूली करणाऱ्या खासगी बँक व्यवस्थापकाच्या डोक्यावर पिस्तूल ठेवत बॅग सोड नाहीतर गोळी मारेल अशी धमकी देत त्याच्याकडील बॅगेतील रोकड आणि मोबाईल टॅब असा एकुण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांच्या मुद्देमालाची लूट केल्याचा धक्कादायक प्रकार विटनेर गावाच्या रस्त्यावर घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जामनेर येथील क्रेडिट एक्सेस ग्रामीण लिमिटेड अर्थात एनबीएफसी या बँकेत केंद्र व्यवस्थापक म्हणून सुनील शेषराव पाढाळे (वय-२६) रा. रहिमाबाद ता. सिल्लोड जि. औरंगाबाद ह.मु. हिवरखेडा रोड जामनेर हे नोकरीला आहे. त्यांच्या बँकेच्या माध्यमातून महिला बचत गटांना लघु उद्योगासाठी कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वसुलीसाठी त्यांनी शाखेमार्फत १० कर्मचारी नेमले आहे.

त्या माध्यमातून ते जिल्ह्यातील ३५ केंद्रातून पैसे वसूलीचे काम करतात. सुनील पाढाळे हे मंगळवारी (दि. २२) मार्च रोजी कर्जाची रक्कम वसूली करण्यासाठी वराडमार्गे लोणवाडी येथे दुचाकी क्रमांक एमएच २० डीजे १६६० वरून गेले. त्यांनी पाच महिलांकडून एकूण ९५ हजार ८७३ रुपयांची वसुली करून दुपारी १२ वाजेच्या सुमारास वरडमार्गे विटनेरकडे दुचाकीने निघाले. दुपारी १ वाजेच्या सुमारास वराड आणि विटनेर गावाच्या रस्त्यावर असलेल्या रस्त्याने जात असताना त्यांच्यामागून अज्ञात तीन व्यक्ती दुचाकीने पाठलाग करत आले. पुढे सुनील पाढाळे यांच्या दुचाकीला ओव्हरटेक करून पुढे गेले.

तिघे दुचाकी समोर अचानक आल्याने सुनील यांनी अचानक ब्रेक लावला व ते खाली पडले. त्यानंतर दुचाकीवरील तिघांनी त्यांच्याजवळ येऊन २ चापटा मारल्या व त्यांच्या खांद्याला लावलेले पैशांची बॅग ओढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सुनील यांनी याला विरोध केला असता त्यातील एकाने कमरेतून पिस्तूल काढून त्यांच्या डोक्याला लावली. म्हणाला की, "बॅग सोड नाहीतर गोळी मारेल" अशी धमकी दिली. पैश्यांची बॅग जबरी हिसकावून दुचाकीवरून पसार झाले. या बॅगमध्ये ९५ हजार ८७३ रुपयांची रोकड आणि सुनील यांचा १८ हजार ७५६ रुपये किमतीचा मोबाईल टॅब असा एकूण १ लाख १४ हजार ६२९ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी सुनील पाढाळे यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, सहाय्यक पोलिस अधीक्षक कुमार चिंथा, पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे, सपोनि अमोल मोरे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, स्वप्नील पाटील, हेमंत पाटील, प्रदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे अंमलदार घटनास्थळी धाव घेवून माहिती जाणून घेतली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोउनि रवींद्र गिरासे, सचिन मुंडे करीत आहे.

हेही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT