गोवा : हवामान अंदाज होणार अधिक अचूक ;गोवा वेधशाळेचा प्रस्ताव | पुढारी

गोवा : हवामान अंदाज होणार अधिक अचूक ;गोवा वेधशाळेचा प्रस्ताव

पणजी : पिनाक कल्लोळी
गोवा वेधशाळेने राज्यात चार नवीन स्वयंचलित हवामान केंद्र बसविण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, नवीन केंद्रांमुळे राज्यातील हवामानाचा अंदाज अधिक अचूक होणार असल्याची माहिती वेधशाळेचे शास्त्रज्ञ राहुल मोहन यांनी दिली. सध्या राज्यात चार स्वयंचलित हवामान केंद्र आणि पाऊस मोजण्याची पाच यंत्रे आहेत.

नवीन चार केंद्रांपैकी दोन उत्तर गोव्यात तर दोन दक्षिण गोव्यात बसविण्यात येणार आहेत. उत्तर गोव्यात पेडणे तर दक्षिणेत फोंडा येथे हवामान केंद्र उभारण्यात येतील. याशिवाय महत्त्वाची पर्यटन स्थळे आणि शाळांमध्ये केंद्र बसविण्या बाबतही वेधशाळेचा विचार सुरू आहे. मात्र या दोन केंद्रांबाबत अजून अंतिम निर्णय झालेला नाही. स्वयंचलित केंद्रांमुळे त्या भागातील हवामानावर परिणाम करणार्‍या घटकांची तपशीलवार माहिती मिळते. यामध्ये तापमान, वार्‍याचा वेग, वार्‍याची दिशा, आर्द्रता, दृश्यमानता आणि वातावरणीय दाबाची माहिती गोळा केली जाते. जेवढी जास्त माहिती गोळा केली जाते तेवढीच हवामान अंदाजाची अचूकता वाढते . नवीन केंद्र दर 15 मिनिटांनी माहिती देऊ शकतात.

पारंपरिक केंद्राप्रमाणे स्वयंचलित हवामान केंद्रात मनुष्यबळाची गरज नसते. त्यामुळे ते दूरस्थ भागातही उभारले जाऊ शकतात. स्वयंचलित केंद्रातून अगदी काही मिनिटांत मोठ्या प्रमाणात माहिती गोळा केली जाऊ शकते.
– राहुल मोहन, शास्त्रज्ञ

Back to top button