पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताच्या चांद्रयान-3 ने बुधवारी (दि.२३) चंद्रावर यशस्वी लँडिंग केले. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा जगातील पहिला देश ठरला आहे. त्याचबरोबर इस्रोच्या लाइव्ह स्ट्रीमिंग लिंकनेही यूट्यूबवर इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या लँडिंगचे लाईव्ह स्ट्रीमिंग एकाच वेळी ८.०६ दशलक्ष लोकांनी पाहिले. या लाईव्ह स्ट्रीमिंगने यूट्यूब (YouTube) इतिहासातील सर्व रेकॉर्ड मोडले आहेत. जगातील सर्वाधिक पाहिला जाणारा हा थेट प्रक्षेपण (लाईव्ह) ठरले आहे. (ISRO YouTube)
आतापर्यंत YouTube वर, ब्राझील वि. कोरियाच्या फुटबॉल सामन्याचे थेट प्रक्षेपण ६.१५ दशलक्ष लोकांनी एकावेळी पाहिले होते. ज्याचा बुधवारी (दि.२३) चांद्रयान-3 च्या थेट प्रक्षेपणाने विक्रम मोडला आहे. यूट्यूब लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर असलेला ब्राझील विरुद्ध क्रोएशिया फुटबॉल सामना जो एकाच वेळी ५.२ दशलक्ष लोकांनी पाहिला होता.
इस्रोच्या अधिकृत YouTube चॅनेलवर चांद्रयान-3 च्या लँडिंगपूर्वी, सदस्यांची संख्या २.६८ दशलक्ष म्हणजे सुमारे २६ लाख होती, जी यशस्वी लँडिंगनंतर आता ३५ लाख झाली आहे. लँडिंगचे थेट प्रक्षेपण सुमारे एक तास ११ मिनिटे चालले आणि केवळ एका तासात इस्रोने नऊ लाख सदस्य मिळवले. इस्रोचे थेट प्रक्षेपण एकाच वेळी पाहणाऱ्या सदस्यांच्या संख्येपेक्षा तिप्पट आहे.
हेही वाचा