आंतरराष्ट्रीय

‘बिकिनी’ विरोधात नॉर्वेच्‍या महिला खेळाडूंचे बंड ! क्रीडा क्षेत्रातील ‘सक्‍ती’वर हल्‍लाबोल

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : महिलांनी कोणते कपडे वापरावेत, यापेक्षा त्‍यांनी कोणते कपडे वापरु नयेत, यावर सर्वाधिक चर्चा हाेते. अशाच मानसिकतेतून युराेपमध्‍ये बीच हँडबॉल खेळताना महिलांनी 'बिकिनी' परिधान करणे सक्‍तीचे आहे. या 'बिकिनी' सक्‍तीविराेधात नॉर्वच्‍या बीच हँडबॉल टीमने बंड केले आहे.

या संघातील महिला खेळाडूंनी 'आम्‍ही खेळताना आरामदायक (कम्‍फर्टेबल) अशीच वेषभूषा करणार, असा पावित्रा घेतला.  या पाठाेपाठ रविवारी टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये पात्रता फेरीत जर्मनीच्‍या जिम्नॅस्टिक महिला संघानेही पूर्ण वेषभूषा केली.

या दोन्‍ही संघांमधील खेळाडूंनी महिलाच्‍या क्रीडा प्रकाराकडे बघण्‍याची 'मानसिकता' बदला, असा संदेश दिला आहे.

अधिक वाचा 

काय आहे प्रकरण ?

रविवार (दि. २५) बल्‍गेरियात सुरु असलेल्‍या हँडबॉलच्‍या युरो २०२१ स्‍पर्धेत नॉर्वे विरुद्‍ध स्‍पेन असा सामना होता.

यावेळी क्रीडा प्रकाराच्‍या नावाखाली महिलांवर लादले गेलेल्‍या ड्रेसकोड विरोधात नॉर्वेच्‍या संघाने बंड केले. त्‍यांनी बकिनी बॉटम्‍स परिधान करुन खेळण्‍यास नकार दिला.

त्‍याऐवजी पुरुष संघासारख्‍या शॉर्ट्‍स परिधान करुन सामना खेळला. यामुळे शिस्‍तभंग झाल्‍याचा ठपका ठेवत युरोपियन हँडबॉल फेडरेशनने नॉर्वेच्‍या संघाला दीड हजार 'युरो'चा दंड केला.

नॉर्वेच्‍या हँडबॉल फेडरेशनने महिला संघाच्‍या भूमिकेला पाठिंबा दिला आहे. 'आम्‍ही दंड भरु मात्र आमच्‍या मुद्‍यावर ठाम राहू' असे स्‍पष्‍ट केले आहे.

महिला खेळाडूंसाठी वेगळा नियम

आंतरराष्‍ट्रीय हँडबॉल फेडरेशनच्‍या नियमांनुसार, बीच हँडबॉलमध्‍ये महिला खेळाडूंना मिड्रिफ-बारिंग, बिकिनी बॉटम्‍स वापरासाठीचे नियम वेगळे आहेत.

खेळाडूच्‍या मापाऐवजी युरोपियन हँडबॉल फेडरेशनने दिलेल्‍या मापाचीच बिकिनी बॉटम्‍स वापरावी लागते.

यामुळे काही महिलांना खेळाडूंना संकाेचल्‍यासारखे हाेते. सहजताच गमावते. त्‍यामुळे हा हा नियम महिला खेळाडूंसाठी अन्‍यायकारक आहे, असे नार्वेच्‍या खेळाडूंनी स्‍पष्‍ट केले आहे. हाच खेळ खेळताना पुरुष शॉर्ट आणि टीशर्ट वापरतात.

एकाच खेळात महिला आणि पुरुषांच्‍या ड्रेसकोडमध्‍ये दुजाभाव का, अस सवालही त्‍यांनी उपस्‍थित केला आहे.

आम्‍हाला ज्‍यामध्‍ये आरामदायक (कम्‍फर्टेबल) वाटेल अशीच  वेषभूषा आम्‍ही करणार, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले आहे.

अधिक वाचा 

जिमनॅस्‍टिकमध्‍ये केवळ महिला खेळाडूंनाच ड्रेसकाेड

जिम्नॅस्टिकमध्ये महिला आणि पुरुषांसाठी वेगवेगळे ड्रेस कोड आहेत. पुरुष जिम्नॅस्टिक क्रीडा प्रकारात सहभागी होताना फुल बॉडीसूट परिधान केला. याला 'युनिटाड' असे म्‍हणतात.

महिला जिम्नॅस्टिक या 'लीयटाड' वापरात हा बिकिनी स्‍टाइल ड्रेस असतो. यामध्‍ये अनेक महिला खेळाडूंना कम्‍फर्टेबल वाटत नाही, अशा तक्रारी यापूर्वीही करण्‍यात आल्‍या आहेत.

नॉर्वेच्‍या महिला संघापाठोपाठ टोकियो ऑलिम्‍पिकमध्‍ये सहभागी झालेल्‍या जर्मनीच्‍या जिम्नॅस्टिक संघाच्‍या खेळाडू फूल बॉडी सूट परीधान करुन स्‍पर्धेत सहभागी झाल्‍या.

खेळताना आरामदायक वाटेल, अशीच वेषभूषा आम्‍ही करणार असे, जर्मनीची खेळाडूंनी म्‍हटले आहे. खेळाडूसंह क्रीडा रसिकांनाही याचे जोरदार समर्थन केले आहे.

'दंड करणार्‍यांनाच दंड करा'

'मला नॉर्वच्‍या महिला बीच हँडबॉल टीमवर गर्व आहे. बिकिनीविरोधात बंड करणार्‍या नॉर्वेमधील महिला संघाला दंड करण्‍यापेक्षा दंड सुनावणार्‍या युरोपियन हँडबॉल फेडरेशनलाच दंड करावा. फेडरेशनची विचार करण्‍याची प्रवृती ही महिलाविरोधी आहे, असे अमेरिकेचे ग्रॅमी ऑवर्ड विजेती गायिका गायक पिंक हिने म्‍हटले आहे.

जगभरात नॉर्वेच्‍या टीमच्‍या भूमिकेला पाठिंबा मिळत आहे. यानंतर युरोपिय हँडबॉल फेडरेशनने आपला बचाव करत या टीमचा पोशाखच 'अयोग्‍य' होता, असा दावा केला आहे.

आम्‍ही महिलांविरोधात असलेल्‍या नियमांना विरोध करु. पुढील मॅच खेळताना बिकिनी बॉटम्‍सऐवजी शॉर्टस आणि टी र्शटच वापरणार, असे स्‍पष्‍ट केले आहे.

नॉर्वे टीमला झालेल्‍या दंडाचा जगभरातून सोशल मीडियावर विरोध होत आहे.

बक्षीस रक्‍कमेतही भेदभाव

आज बहुतांश सर्व खेळांमध्‍ये महिला सहभागी होता. मात्र बक्षीस रक्‍कमेमध्‍ये प्रचंड तफावत दिसते.

महिला फुटबॉल विश्‍वचषक स्‍पर्धेसाठी पुरुषांना ३८ दक्षलश डाॅलरचे बक्षीस मिळते. तर महिलांसाठी केवळ २ दशलक्ष डॉलर. हेच चित्र क्रिकेट, हॉकी आणि दुसर्‍या खेळांमध्‍येही आहे.

खेळ एक सारखा, कष्‍टही तेवढेचे तरीही बक्षीसांच्‍या रक्‍मेत फरक का, अशी विचारणा नेहमीच महिला खेळाडूंकडून हाेत असते.

महिला खेळाडूची वेषभूषा नेहमीच टार्गेट

महिला खेळाडूंनी अत्‍यंत तोकडे कपडे घातले की त्‍यांच्‍यावर टीका होते. तर दुसरीकडे नियमांच्‍या नावाखाली त्‍यांना बिकिनी बॉटम आणि शॉर्ट स्‍कर्टची सक्‍ती केली  जाते.

भारतात सानिया मिर्झाने टेनिस खेळताना शॉर्ट स्‍कर्ट घातला म्‍हणून तिच्‍याविराेधात फतवा जारी करण्‍यात आला होता.

२०११मध्‍ये बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशननेही महिला खेळाडूंनी अधिक आकर्षक दिसावे यासाठी शॉर्टसऐवजी स्‍कर्ट परिधान करावा, असा आदेश दिला होता. याला कडाडून विरोध झाल्‍यानंतर हा आदेश मागे घेण्‍यात आला होता.

हेही वाचलं का ? 

पाहा व्‍हिडीओ : कोयना धरणातून सोडलेले पडणारे पाणी लाल का आहे? काय आहे या लाल पाण्याचे रहस्य?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT