आंतरराष्ट्रीय

नवी दिल्ली : युक्रेन-रशिया संघर्षाचा परिणाम भारतामध्ये सर्वांच्याच खिशावर

सोनाली जाधव

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
युक्रेन-रशिया संघर्षाचा परिणाम सर्वांच्याच खिशावर होणार असून, त्यात भारताचाही समावेश आहे. दोन्ही देशांत संघर्ष सुरू होताच आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर 8 वर्षांतील उच्चांकी पातळीवर (95 डॉलर्स प्रतिबॅरल) गेले आहेत. कच्चे तेल महागल्याने पेट्रोल, डिझेलमध्ये दरवाढ निश्‍चित मानली जात आहे. घरगुती गॅस, सीएनजीही महागणार असल्याचे संकेत आहेत.

सोन्याचे दरही या वादामुळे वाढले आहेत. तोळ्यामागे 50,500 रुपयांची पातळी सोन्याने ओलांडली आहे. चांदीतही तेजी आहे. तांबे आणि
अ‍ॅल्युमिनियमच्या दरातही या वादामुळे तेजी येणार आहे.

उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुका आटोपताच महागाईचा हा झटका बसू शकेल. 10 मार्चनंतर पेट्रोल, डिझेल महागणार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात लिटरमागे 15 ते 20 रुपयांपर्यंत वाढ शक्य आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
नैसर्गिक वायूच्या पुरवठा साखळीलाच फटका बसला, तर दरवाढ अटळ आहे. जगभरातील एकूण नैसर्गिक वायूच्या उत्पादनात रशियाचा वाटा 17 टक्के आहे. येत्या काही दिवसांत एलपीजी आणि सीएनजीच्या दरात किलोमागे 10 ते 15 रुपये वाढ शक्य आहे. जगभरातील एकूण अ‍ॅल्युमिनियम उत्पादनात 6 टक्के वाटा रशियाचा आहे. फेब्रुवारीतच या धातूत 15 टक्के दरवाढ झालेली आहे. तांबे उत्पादनातही रशियाचा 3.5 टक्के वाटा आहे.

युद्ध पेटले तर चुली पेटणार नाहीत

रशिया आणि युक्रेन मिळून जगभरात 25.4 टक्के गहू निर्यात करतात. रशियाचा वाटा यात 18 टक्क्यांहून जास्त आहे. इजिप्‍त, तुर्कस्तान, इंडोनेशिया, बांगला देश आणि नायजेरियासह डझनावर देश गव्हासाठी या दोन देशांवर अवलंबून आहेत. युक्रेनला युरोपमध्ये 'ब्रेड बास्केट' म्हणून ओळखले जाते. दोन्ही देशांत युद्ध पेटले, तर अनेक देशांत चुली पेटणार नाहीत किंवा मग या देशांना त्यासाठी अमेरिकेकडे तोंड करावे लागेल.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT