वॉशिंग्टन/मॉस्को ; वृत्तसंस्था : युक्रेन-रशियादरम्यान (Ukraine-Russia conflict) परिस्थिती चिघळतच चाललेली आहे. पूर्व युक्रेनमधील लुहान्स्क आणि डोनॅस्टक शहरांत रशियन विघटनवादी आणि युक्रेनच्या लष्करादरम्यान चकमकी सुरू आहेत. युक्रेनच्या 5 घुसखोरांना ठार मारल्याचा दावा सोमवारी रशियन लष्कराने केला, तर रविवारी रात्री उशिरा युक्रेनमधील रशियासमर्थक बंडखोरांनी युक्रेन लष्कराच्या 16 ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले.
दुसरीकडे, युक्रेनच्या सैनिकांनी सीमेवरील रशियन ठिकाणे नेस्तनाबूत केल्याचा आरोप सोमवारी सकाळी रशियाने केला. युक्रेनने या आरोपांचा इन्कार केला आहे.
सोमवारीच सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बोलताना रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी, शांततेचे कितीही प्रस्ताव तयार केले; तरी युक्रेन प्रश्न त्यामुळे सुटेल असे वाटत नाही, असे स्पष्ट केले. याद्वारे युद्धाचे आपले इरादेच पुतीन यांनी बुलंद केले आहेत.
'कुणाकुणाला ठार करायचे, त्याची यादीच'
दरम्यान, अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांना एक पत्र पाठविले असून, रशिया युद्धादरम्यान युक्रेनमधील निवडक लोकांचा सर्वनाश घडवून आणेल. काहींना यातना शिबिरांत डांबून त्यांचा छळ करेल, असे या पत्रातून संयुक्त राष्ट्रांच्या निदर्शनाला आणून दिले आहे.
रशियाने अशा नावांची यादीच तयार केलेली असल्याचा दावा अमेरिकेने केला आहे. रशियाच्या पुढाकाराने युक्रेनमध्ये स्थापन झालेल्या याआधीच्या सरकारबद्दल नाराज असलेले लोक, धार्मिक, जातीय अल्पसंख्याक रशियाचे लक्ष्य असतील, असेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.
पुतीनना भेटेन; पण… : बायडेन (Ukraine-Russia conflict)
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी युक्रेन संकटावर मार्ग काढण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांची भेट घेण्याची तयारी दर्शविली आहे. तथापि, भेटीपूर्वी पुतीन यांनी रशिया कुठल्याही परिस्थितीत युक्रेनवर आक्रमण करणार नाही, असा शब्द द्यावा, ही अट बायडेन यांनी ठेवली आहे. सर्व जमून आले तर आठवड्याअखेरीस दोन्ही नेत्यांची भेट होईल, असे 'न्यूयॉर्क टाइम्स' या वृत्तपत्राने म्हटले आहे.
…तर रशियावरही हल्ला
रशियातील अमेरिकन दूतावासाने मॉस्को, सेंट पीटर्सबर्गसह अनेक शहरांवर, रेल्वेसेवा, मेट्रो स्थानके, सार्वजनिक ठिकाणांवर हल्ला होऊ शकतो, असा इशारा जारी करून रशियातील अमेरिकन नागरिकांनी त्वरित रशियाबाहेर पडावे, अशी सूचना जारी केली आहे.
मॅक्रॉन यांची मध्यस्थी
इकडे बायडेन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी युक्रेन-रशिया संकटावर चर्चा केली. मॅक्रॉन यांनी युक्रेनच्या सार्वभौमत्वाला आपला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला. मॅक्रॉन यांनी नंतर पुतीन यांच्याशीही चर्चा केली. युक्रेन वादातील तणाव कमी करण्यास रशिया तयार आहे, असे यावेळी रशियाकडून सांगण्यात आले.
पाच युक्रेनी घुसखोर ठार : रशिया
युक्रेनमधून रशियाच्या हद्दीत विध्वंसाच्या उद्देशाने घुसखोरी करणार्या 5 जणांना आम्ही ठार केले, असा दावा रशियन लष्कराने केला आहे. मॉस्कोत शिरून धुडगूस घालण्याचा घुसखोरांचा इरादा होता. तो आम्ही हाणून पाडला, असेही रशियन लष्कराने स्पष्ट केले आहे.