लंडन; पुढारी ऑनलाईन : ब्रिटन म्हटलं की सारे कसं शिस्तबद्ध. या देशातील नागरिकांसह प्रशासनही शिस्तप्रिय. कोणतेही काम हे नियोजनबद्धरित्याच करावे, अशी या देशाची जगभर ओळखही आहे. या देशातून थेट महाराणी एलिझाबेथ यांच्या संदर्भात असणारा गोपनीय अहवाल 'ऑपरेशन लंडन ब्रिज' लीक झाल्याने महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूपूर्वीच त्यांच्या मृत्यूनंतरच्या करण्यात येणार्या तयारीचे वृत्त समोर आले आहे. दरम्यान, 'ऑपरेशन लंडन ब्रिज' लीक झाल्यासंदर्भात भाष्य करण्यास बकिंगहॅम पॅलेसच्या सूत्रांनी भाष्य करण्यास नकार दिला आहे.
मीडिया रिर्पाटनुसार, 'ऑपरेशन लंडन ब्रिज' हा महाराणी एलिझाबेथ यांच्या संदर्भातील गोपनीय अहवाल आहे. राणी एलिझाबेथ सध्या ९५ वर्षांच्या आहेत. ब्रिटनच्या राजघराण्यातील सर्वाधिक काळ राणीपद त्यांनी भूषवले आहे. मात्र त्यांच्या मृत्यू नंतर कोणत्या गोष्टी कराव्यात याची माहिती असणारा हा अहवाल आहे.
ऑपरेशन लंडन ब्रिजमधील गोपनीय माहिती हाती लागली असल्याचा दावा अमेरिकेतील वृत्तसंस्था पॉलिटिकोने केला आहे. या रिर्पाटनुसार या अहवालात महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूनंतर प्रशासकीय नियाेजन आणि महाराणी एलिझाबेथ यांचे उत्तराधिकारी प्रिन्स चार्ल्स यांची भूमिकेचा उल्लेख आहे.
राणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर १० दिवसांनंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. त्यापूर्वी महाराणी एलिझाबेथ यांचे पुत्र व उत्तराधिकारी प्रिन्स चार्ल्स हे संपूर्ण देशाचा दौरा करतील. तसेच ते चार देशांचा दौराही करतील.
महाराणी एलिझाबेथ यांचा मृतदेह तीन दिवस संसद परिसरात ठेवला जाईल. यावेळी देशातील लाखो नागरिक अंत्यदर्शनासाठी येतील. लंडनमध्ये प्रचंड गर्दी होईल. गर्दीमुळे नागरिकांना खाद्यपदार्थांचाही तुटवडा जाणवेल. पोलिस यंत्रणेलाही अपुरे मनुष्यबळाचा सामना करावा लागेल, असा अंदाजही या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
यावेळी प्रचंड गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सुरक्षा ऑपरेशनचीही तयारी करण्यात यावी. अंत्यसंस्कारादिवशी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात येईल, असेही या अहवालात म्हटले असल्याचे 'पॉलिटिको'ने म्हटले आहे.
२०१७मध्ये द गार्डियन या दैनिकात 'ऑपरेशन लंडन ब्रिज' संदर्भात एक लेख प्रकाशित झाला होता.
महाराणी एलिझाबेथ यांच्या निधनानंतर प्रिन्स चार्ल्स हे त्यांचे उत्तराधिकारी असतील, असे या लेखात नमूद केले होते.
दरम्यान, या अहवालासंदर्भात भाष्य करण्यास बकिंगहॅम पॅलेसच्या सूत्रांनी यावर भाष्य करण्यास नकार दिला आहे.
हेही वाचलं का ?