x suspends ahead account mohan bhagwat new york event
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांच्या न्यू यॉर्क शहरातील कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्या 'अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग' (AHEAD) या संस्थेचे 'X' (ट्विटर) खाते निलंबित करण्यात आले आहे. या कारवाईमुळे सोशल मीडियावर मोठी खळबळ उडाली आहे.
'अमेरिकन हिंदूज फॉर एंगेजमेंट अँड डायलॉग' (AHEAD) या संस्थेचे 'X' खाते युजर्ससाठी अनुपलब्ध आहे. यावर संस्थेने पीटीआयला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "हे निलंबन कदाचित चुकीने झाले असावे. आमचे सर्व संवाद हे X च्या नियमांचे पालन करून जागतिक शांतता, एकता, सलोखा आणि अंतर-धार्मिक संवादाला प्रोत्साहन देणारेच राहिले आहेत."
मोहन भागवत सध्या अमेरिका, कॅनडा आणि ब्रिटन या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याचा भाग म्हणून २९ ऑगस्ट रोजी न्यू यॉर्क येथील प्रसिद्ध मॅडिसन स्क्वेअर गार्डन मधील इन्फोसिस थिएटरमध्ये आयोजित 'युनिव्हर्सल वननेस सेलिब्रेशन' कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत.
दरम्यान, अमेरिकेच्या धार्मिक स्वातंत्र्यावरील सल्लागार संस्थेने (USCIRF) ट्रम्प प्रशासनाला मोहन भागवत यांचा व्हिसा रद्द करण्याची मागणी केली आहे. आरएसएसच्या उपगटांनी धार्मिक अल्पसंख्याकांवर हिंसक हल्ले केले असल्याचा आरोप या संस्थेने केला आहे. भारताने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी USCIRF ला पक्षपाती आणि विश्वासार्हता नसलेली संस्था म्हटले आहे. "या संस्थेचा स्वतःचा एक अजेंडा आहे. भारताच्या बहुलतावादी चौकटीची आणि विविध समुदायांच्या शांततापूर्ण सहअस्तित्वाची नोंद ही संस्था घेईल, अशी अपेक्षा आम्ही करत नाही," असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.
भारतीय वंशाच्या चित्रपट निर्मात्या मीरा नायर यांचे सुपुत्र असलेले न्यू यॉर्कचे महापौर झोहरान ममदानी यांच्या विधानामुळे या कार्यक्रमावरून वाद निर्माण झाला आहे. ममदानी म्हणाले, "मी या रॅलीचे समर्थन करत नाही. आरएसएसची विचारधारा ही एकाधिकारशाहीवर आधारित असल्याने ती अत्यंत चिंताजनक आहे." ममदानी यांच्या या वक्तव्यानंतर भारतातही राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.