२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला.
तेहराण : इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्या हत्येला अनेक आठवडे उलटून गेले तरी अद्याप त्यांचा अंत्यसंस्कार होऊ शकलेला नाही. 'न्यूयॉर्क पोस्ट'च्या वृत्तानुसार, खामेनींचे दफन कधी आणि कुठे करायचे, याचा निर्णय इराणी अधिकारी अद्याप घेऊ शकलेले नाहीत.
अयातुल्ला अली खामेनी यांच्या दफनविधी विलंबामागील सर्वात मोठे कारण 'सुरक्षा' हे सांगितले जात आहे. सध्याची सुरक्षा स्थिती अत्यंत संवेदनशील असून, मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक अंत्यसंस्कार केल्यास इस्रायलकडून हल्ला होण्याची किंवा देशांतर्गत अशांती पसरण्याची भीती इराणला वाटत आहे. युद्धजन्य परिस्थिती आणि सततच्या तणावामुळे कोणताही मोठा कार्यक्रम आयोजित करणे धोक्याचे मानले जात आहे.
२८ फेब्रुवारी २०२६ रोजी अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण आखाती देशांमधील संघर्ष अधिक तीव्र झाला. १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्लाह खामेनी यांच्या निधनानंतर इराणमध्ये जनसागर लोटला होता, तशी गर्दी यावेळी पाहायला मिळालेली नाही. विश्लेषकांच्या मते, इराण सरकारला अंतर्गत विरोध आणि संभाव्य निदर्शनांची भीती आहे. मोठी गर्दी जमल्यास त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होऊ शकते, म्हणूनच दफनविधी टाळला जात आहे.
माध्यमांतील माहितीनुसार, खामेनी यांचे मूळ गाव असलेल्या मशहद येथे त्यांचा दफनविधी होण्याची शक्यता आहे. येथील 'इमाम रझा दरगाह' धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून तिथली सुरक्षा व्यवस्थाही कडक आहे. सुरुवातीला ४ मार्चपासून तीन दिवसांच्या राजकीय अंत्यसंस्काराचे नियोजन करण्यात आले होते; परंतु अमेरिका-इस्रायलच्या वाढत्या हल्ल्यांमुळे ते रद्द करण्यात आले. ८ एप्रिल रोजी तात्पुरती युद्धबंदी होऊनही परिस्थिती अद्याप अनिश्चित असल्याने दफनविधीची तारीख निश्चित होऊ शकलेली नाही.
रविवारी (दि. १९) प्रेस टीव्हीशी बोलताना इराणी संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बगेर गालिबफ म्हणाले की, "अमेरिकेबरोबर चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी इराणचे सशस्त्र दल युद्धासाठी पूर्णपणे सज्ज आहे. आम्हाला शत्रूवर अजिबात विश्वास नाही. आम्ही इथे चर्चा करत असतानाही युद्ध पेटू शकते. आमचे लष्कर जमिनीवर पूर्णपणे सज्ज आहे. चर्चेमुळे आम्ही सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहोत, असे समजू नका."
पाकिस्तानी चॅनेल 'जियो टीव्ही'ने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणमधील चर्चेची दुसरी फेरी पुढील आठवड्यात इस्लामाबादमध्ये होऊ शकते. २८ फेब्रुवारीला अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यात ३,००० हून अधिक लोक मारले गेले होते. ८ एप्रिलला दोन्ही बाजूंनी दोन आठवड्यांच्या युद्धबंदीची घोषणा केली होती. मात्र, अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. अमेरिकेने इराणी बंदरांची नाकेबंदी सुरू केली असून, मध्यस्थांमार्फत पुन्हा एकदा चर्चेचे प्रयत्न सुरू आहेत.