White House Shooting Afghan Suspect: अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमध्ये बुधवारी व्हाइट हाऊसपासून काहीच अंतरावर झालेल्या गोळीबाराने पुन्हा एकदा सुरक्षेचा गंभीर प्रश्न समोर आला आहे. फारागट स्क्वेअर या गजबजलेल्या भागात झालेल्या या हल्ल्यात दोन नॅशनल गार्डसह एकूण तीन जण गंभीर जखमी झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काही क्षणांतच गोंधळ आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं.
गोळीबार करणाऱ्या व्यक्तीला घटनास्थळावरून जिवंत पकडण्यात आलं असून त्याची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात उघड झालं की आरोपी परिसरात आधीपासूनच बसला होता. नॅशनल गार्डचे जवान नियमित तपास करत असताना त्याने अचानक गोळीबार सुरू केला.
हल्लेखोराची ओळख 29 वर्षीय रहमानुल्लाह लकनवाल अशी झाली आहे. तो अफगाणिस्तानचा नागरिक असून 2021 मध्ये अमेरिकेत दाखल झाला होता. अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य माघारी गेल्यानंतर ज्या अफगाण नागरिकांना अमेरिकेत पाठवण्यात आलं, त्यात रहमानुल्लाहचा समावेश होता. त्याच्या अनवेरिफाइड फेसबुक प्रोफाइलनुसार तो वॉशिंग्टन राज्यातील बेलिंगहॅम शहरात राहत होता. त्याच्या प्रोफाइलवर अफगाणिस्तानचा ध्वजही दिसत होता.
या हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन डीसीमधील सुरक्षेसाठी आणखी 500 नॅशनल गार्ड तैनात करण्याचे आदेश दिले आहेत.
ट्रम्प यांनी म्हटलं, “गोळीबार करणारा स्वतःही गंभीर जखमी आहे. पण त्याने जे केलं आहे त्याची त्याला मोठी किंमत चुकवावी लागेल. देव आपल्या महान नॅशनल गार्डसह सर्व सुरक्षा दलांना आशीर्वाद देवो. आम्ही तुमच्या सोबत आहोत.”