Mojtaba Khamenei Iran New Supreme Leader Pudhari
आंतरराष्ट्रीय

Who is Mojtaba Khamenei: मोजतबा खामेनेई कोण आहेत? पत्नी, मुले आणि संपत्ती… इराणच्या नव्या सर्वोच्च नेत्याबद्दल जाणून घ्या

Mojtaba Khamenei: अयातुल्ला अली खामेनेई यांच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांची इराणच्या नव्या सर्वोच्च नेतेपदी निवड झाल्याची माहिती समोर आली आहे.

Rahul Shelke

Mojtaba Khamenei Iran New Supreme Leader Family Wealth: मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणमध्ये मोठा राजकीय बदल घडल्याची चर्चा आहे. अमेरिका आणि इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तानंतर देशाचे नेतृत्व कोणाकडे जाणार, हा प्रश्न निर्माण झाला होता.

या पार्श्वभूमीवर इराणमधील महत्त्वाची संस्था असेंबली ऑफ एक्सपर्ट यांनी अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा खामेनेई यांची देशाच्या सर्वोच्च नेतेपदी निवड केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामागे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स या शक्तिशाली सुरक्षा संस्थेचा मोठा प्रभाव असल्याचेही सांगितले जात आहे.

मोजतबा खामेनेई यांचे वैयक्तिक आयुष्य

मोजतबा खामेनेई यांची पत्नी जहरा हद्दाद-आदिल असल्याचे सांगितले जाते. त्या इराणमधील प्रभावशाली कंझर्व्हेटिव्ह नेते आणि माजी संसद अध्यक्ष गोलाम अली हद्दाद-आदिल यांच्या कन्या आहेत. मोजतबा आणि जहरा यांचा विवाह 2004 मध्ये झाला होता.

काही अहवालांनुसार 2026 मध्ये झालेल्या संघर्षादरम्यान जहरा हद्दाद-आदिल यांचा मृत्यू झाला. या दाम्पत्याला तीन मुले असल्याचे सांगितले जाते, मात्र त्यांच्या मुलांबाबत सार्वजनिकरित्या फारशी माहिती उपलब्ध नाही.

संपत्तीबाबत चर्चा सुरु

मोजतबा खामेनेई यांच्या संपत्तीबाबतही अनेक आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये चर्चा होत असते. 2019 मध्ये अमेरिकेने त्यांच्यावर आर्थिक निर्बंध लादले होते.

तरीही काही अहवालांनुसार त्यांच्या प्रभावाखाली जगभरातील गुंतवणूक नेटवर्क आणि मोठी संपत्ती असल्याचे दावे करण्यात आले आहेत. स्वित्झर्लंडमधील बँक खात्यांपासून ब्रिटनमधील महागड्या मालमत्तांपर्यंत त्यांचे आर्थिक संबंध असल्याचे काही माध्यमांनी सांगितले आहे. मात्र त्यांच्या एकूण संपत्तीचा अधिकृत आकडा सार्वजनिक झालेला नाही.

वाद का निर्माण झाला?

मोजतबा खामेनेई यांची निवड वादग्रस्त ठरली आहे. कारण ते सार्वजनिक राजकारणात फारसे दिसत नाहीत. त्यांचे वय सुमारे 56 वर्षे असल्याचे सांगितले जाते. धार्मिकदृष्ट्या ते फार उच्च दर्जाचे मौलवी मानले जात नाहीत. तरीही सत्तेच्या केंद्रात त्यांचा प्रभाव असल्याचे मानले जाते. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स आणि बसिज फोर्सशी असलेले जवळचे संबंध.

वंशपरंपरेचा आरोप

1979 मधील इराणी क्रांतीनंतर इराणमध्ये राजेशाही व्यवस्था संपुष्टात आली होती. त्या क्रांतीचा मुख्य उद्देश वंशपरंपरेवर आधारित सत्तेला विरोध करणे हा होता. मात्र आता सर्वोच्च नेत्याच्या मुलालाच सत्ता देण्यात आल्याने अनेकांनी या निर्णयावर टीका केली आहे. विरोधकांच्या मते हा निर्णय क्रांतीच्या मूळ तत्त्वांच्या विरोधात आहे. तर समर्थकांचे म्हणणे आहे की सध्याच्या अस्थिर परिस्थितीत कठोर नेतृत्व आवश्यक आहे.

सुरक्षा संस्थांचा दबाव?

काही वृत्तांनुसार या निवड प्रक्रियेत Assembly of Experts ची भूमिका महत्त्वाची होती, तर प्रत्यक्ष निर्णयामागे सुरक्षा संस्थांचा प्रभाव होता. युद्धासारखी परिस्थिती असल्याने 88 सदस्यांची नियमित बैठक घेणे शक्य नव्हते. त्यामुळे ऑनलाइन बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

नव्या नेत्यासमोरील मोठे आव्हान

मोजतबा खामेनेई यांच्यासमोर सर्वात मोठे आव्हान म्हणजे स्वतःला सक्षम नेता म्हणून सिद्ध करणे. त्यांच्या वडिलांप्रमाणे धार्मिक अधिकार आणि प्रतिष्ठा त्यांच्याकडे नाही. त्यामुळे सत्तेवर पकड ठेवण्यासाठी त्यांना सुरक्षा संस्थांवर अधिक अवलंबून राहावे लागू शकते.

आंतरराष्ट्रीय स्तरावरही या निर्णयावर प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. युद्धसदृश परिस्थिती, अंतर्गत राजकारण आणि नव्या नेतृत्वाची कसोटी, या सर्व घटकांमुळे पुढील काही महिने इराणसाठी अत्यंत निर्णायक ठरणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT