

तेहरान/दुबई : इराण आणि इस्रायल-अमेरिका यांच्यातील युद्ध मंगळवारी चौथ्या दिवशी अधिकच चिघळले. इस्रायलने इराणच्या क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रांना आणि कारखान्यांना लक्ष्य करत हवाई हल्ल्यांचा जोर वाढवला आहे. याला प्रत्युत्तर म्हणून इराणने संपूर्ण आखाती प्रदेशात प्रतिहल्ले सुरू केल्याने ऊर्जा पुरवठा आणि विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे. इराणची राजधानी तेहरान आणि लेबनॉनमध्ये स्फोटांचे आवाज घुमत असतानाच, सौदी अरेबियातील अमेरिकन दूतावासावरही ड्रोन हल्ला झाल्याने खळबळ माजली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हे युद्ध काही आठवडे किंवा त्यापेक्षा जास्त काळ चालेल, असे संकेत दिले आहेत. चार दिवसांच्या या युद्धात आतापर्यंत शेकडो लोकांचा बळी गेला असून, त्यातील बहुतांश इराणमधील आहेत. मृतांचा आकडा हा जवळपास आठशेपर्यंत गेला आहे. मात्र, इराणमधील विस्कळीत संपर्क व्यवस्था, सततचे हवाई हल्ले आणि पत्रकारांवरील निर्बंधांमुळे नेमकी माहिती मिळणे कठीण झाले आहे.
लेबनॉनवरही हल्ला
हे युद्ध आता लेबनॉनपर्यंत विस्तारले आहे. सोमवारी हिजबुल्लाहने इस्रायलवर क्षेपणास्त्रे डागल्यानंतर इस्रायलने मंगळवारी बैरुतवर जोरदार हवाई हल्ले केले. इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये अतिरिक्त सैन्य तैनात केले असून सीमेजवळील मोक्याच्या ठिकाणांवर ताबा मिळवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतता सैन्याने इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये शिरल्याचे पाहिले असले, तरी इस्रायलने आमचे सैन्य अजूनही तिथे कार्यरत असल्याचे स्पष्ट केले आहे.
तेहरानसह अनेक शहरे स्फोटांच्या आवाजांनी हादरली
सोमवारी रात्रीपासून मंगळवार पहाटेपर्यंत इराणची राजधानी तेहरानसह अनेक शहरे स्फोटांच्या आवाजांनी हादरून गेली. इस्रायल आणि अमेरिकेने संयुक्तपणे इराणमधील अणू प्रकल्प आणि इतर मोक्याच्या ठिकाणांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ले केले आहेत. रात्रभर आकाशात लढाऊ विमानांचा घोंगावा आणि स्फोटांचे आवाज ऐकू येत होते.