Who Is Balendra Shah Nepal PM Campaign :
नेपाळमध्ये झालेल्या हिंसक आंदोलनानंतर नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला आहे. त्याचबरोबर अनेक मंत्र्यांनी देखील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. नेपाळमधील Gen Z ने देशातील भ्रष्टाचार आणि नेपोटीझमविरूद्ध जोरदार आंदोलन सुरू केलंय. आंदोलकांनी संसदेपासून न्यायालयापर्यंत सर्व इमारतींना लक्ष्य केलं होतं. स्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्यात आलं आहे. दरम्यान, नेपाळचा पुढचा नेता कोण याची चर्चा देखील सुरू झाली आहे. यात काठमांडूचे युवा महापौर बालेंद्र शहा यांचं नाव सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आलं आहे.
नेपाळचे पंतप्रधान ओली यांनी राजीनामा दिल्यानंतर देशाचा पुढचा नेता कोण याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान ऑनलाईन कॅम्पेनमध्ये सध्या काठमांडूचे महापौर बालेंद्र शहा आघाडीवर आहेत. बालेंद्र शहा हे बालेन या नावानं प्रसिद्ध असून ते ३५ वर्षाचे आहेत. ते राजकारणात येण्यापूर्वी रॅपर होते. ते २०२२ पासून काठमांडूचे महापौर आहेत. त्यांनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली आणि जिंकली, ते काठमांडूचे पहिले अपक्ष महापौर ठरले.
बालेन यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल बोलायचं झालं तर ते सिव्हील इंजिनिअर आहेत. त्यांचं इंडियन कनेक्शन देखील आहे. त्यांनी कर्नाटकातील विश्वेश्वरय्या टेक्लॉलॉजिकल विद्यापीठातून स्ट्रक्चरल इंजिनिअरची डिग्री घेतली आहे. राजकारणात येण्यापूर्वी ते नेपाळच्या हिप हॉप ग्रुपचे सदस्य होते. हा अंडरग्राऊंड हिप हॉपचा ग्रुप देशातील भ्रष्टाचार आणि नेपोटीझमवर आधारीत गाणी तयार करत होता.
बालेन यांनी २०२३ मध्ये सर्वांच लक्ष वेधून घेतलं. त्यांनी काठमांडूमध्ये भारतीय चित्रपटांच्या स्क्रीनिंगवर बंदी घातली होती. त्यांचा आदीपुरूष चित्रपटातील संवादांवर आक्षेप होता.
बालेन यांनी मंगळवारी फेसबुकवर पोस्ट करत आंदोलकांना पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांचे राजीनामे आल्यानंतर आंदोलन स्थगित करण्याचे आवाहन केलं होतं. त्यांच्या मते देशाच्या संपत्तीचं नुकसान हे खरं तर आपल्या स्वतःच्या संपत्तींच नुकसान असतं. त्यांनी आंदोलकांना आता आपण सर्वांना संयमानं घेणं गरजेचं आहे अशी विनंती देखील केली.
दरम्यान, सोशल मीडियावर बालेंद्र शहा यांना आता तुम्ही देशाची सूत्रे हातात घ्या अशी मागणी वाढत आहे. तसं कॅम्पेन सोशल मीडियावर सुरू झालं आहे.