Sanjay Raut On Nepal Protest :
भारताचा सख्खा शेजारी नेपाळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून Gen Z चं मोठं आंदोलन सुरू आहे. सुरूवातीला हे आंदोलन सरकारनं सोशल मीडियावर घातलेल्या बंदीविरूद्ध होतं. मात्र त्याच जोडीला आंदोलनकर्त्यांनी देशातील भ्रष्टाचार आणि भाई भतिजा वाद याबाबतही आंदोलन छेडलं होतं. या आंदोलनाला पहिल्याच दिवशी हिंसक वळण लागलं. यात २५ लोकांचा मृत्यू झाला असून आंदोलकांनी आता संसद, न्यायालय, मंत्र्यांची घरे टार्गेट करणं सुरू केलं आहे.
याच दरम्यान, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक ट्विट केलं. हे ट्विट खोचक आणि सूचक असं दोन्ही प्रकारचं होतं. संजय राऊत यांच्या या ट्विटमुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात एका वेगळ्याच चर्चेला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
संजय राऊत यांनी हे ट्विट हिंदीतून केलं आहे. त्यांनी नेपाळमधील हिंसक आंदोलनचा व्हिडिओ शेअर केला असून त्यावर 'ही घटना कोणत्याही देशात होऊ शकते. सावधान रहा, भारत माता की जय! जय हिंद!' असं तीन ओळीचं ट्विट केलं आहे. संजय राऊत यांनी अशी परिस्थिती भारतात देखील निर्माण होऊ शकते याकडे लक्ष वेधायचं असेल अशा अंदाज या ट्वीटवरून लावलण्यात येत आहे.
दरम्यान, नेपाळमधील परिस्थिती चिघळत असून आंदोलकांनी राष्ट्रपतींच्या निवासस्थानासोबत संसदेला देखील टार्गेट केलं आहे. संसदेताचा सुरक्षा घेरा तोडून आंदोलन आत शिरले आणि त्यांनी संसदेच्या इमारतीला आग लावली. त्याचबरोबर न्यायालयावर देखील आंदोलकांनी हल्ला केल्याचं वृत्त येत आहे.
आंदोलकांचा रोष हा सरकारच्या भ्रष्टाचारावर आणि राजकारण्यांच्या परिवारवादावर आहे. नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी परिस्थिती पाहून आपल्या पदाचा राजीनामा दिला असून ते देश सोडून जाण्याच्या तयारीत असल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय. दुसऱ्या बाजूला सरकारमधील अनेक मंत्र्यांनी राजीनामा दिला असून लष्कर त्यांना सुरक्षित स्थळी पोहचवत आहे.