The Shrinking Moon
वॉशिंग्टन : पृथ्वीचा सर्वात जवळचा शेजारी अशी ओळख असणार्या चंद्राच्या अंतर्गत भागातील तापमानात घट होत आहे. त्यामुळे पृथ्वीचा नैसर्गिक 'उपग्रह' हळूहळू आक्रसत चालला आहे, असा महत्त्वपूर्ण खुलासा चंद्राच्या भूगर्भाचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी केला आहे. ही प्रक्रिया अब्जावधी वर्षांपासून सुरू असली, तरी नवीन विश्लेषणानुसार चंद्राचे आक्रसणे अपेक्षेपेक्षा जास्त वेगाने होत असल्याचे समोर आले आहे.
'नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमच्या सेंटर फॉर अर्थ अँड प्लॅनेटरी स्टडीज'मधील शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे की, चंद्राच्या आतील भाग हळूहळू थंड होत आहे. त्यामुळे चंद्र उष्णता गमावत असून, त्याच्या आतील भाग आकुंचन पावतोय.यामुळे पृष्ठभागाचे कवच सुरकुत्या पडतात आणि संकुचित होतात.
'नॅशनल एअर अँड स्पेस म्युझियमच्या सेंटर फॉर अर्थ अँड प्लॅनेटरी स्टडीज'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ थॉमस आर. वॉटर्स यांनी २०१० मध्ये प्रथमच चंद्र आक्रसत असल्याचे पुरावे मांडले होते. आताच्या नवीन संशोधनाने त्यांच्या दाव्यावर शिक्कामोर्तब केले आहे.
शास्त्रज्ञांच्या मते, चंद्र इतक्यात कुठेही गायब होणार नाही. मात्र, जर तो नाहीसा झाला, तर पृथ्वीवर त्याचे अत्यंत गंभीर परिणाम होतील. चंद्र पृथ्वीचा अक्षीय कल स्थिर ठेवतो, समुद्राच्या लाटांचे नियंत्रण करतो. दीर्घकालीन हवामान बदलांवर प्रभाव टाकतो.चंद्राच्या अभावी पृथ्वीला अत्यंत तीव्र हवामान बदल आणि अस्थिर ऋतूचक्राचा सामना करावा लागेल. तसेच समुद्रातील लाटांची तीव्रता कमालीची घटेल, ज्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टीचे स्वरूप पूर्णपणे बदलू शकते.
ऐतिहासिक नोंदीनुसार, ९०० वर्षांपूर्वी (सन १११० मध्ये) ५ मे च्या रात्री चंद्र अचानक गायब झाला होता. 'पीटरबरो क्रॉनिकल' या हस्तलिखितातील नोंदीनुसार, त्या रात्री चंद्र आकाशात चमकत होता; पण हळूहळू त्याचा प्रकाश मंदावला. यानंतर तो पूर्णपणे दिसेनासा झाला. शास्त्रज्ञांच्या मते, त्यावेळी झालेल्या मोठ्या ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे स्ट्रॅटोस्फीअरमध्ये सल्फरयुक्त कणांचा जाड थर जमा झाला होता. यामुळे चंद्र काही काळासाठी झाकला गेला होता.
चंद्र जसा थंड होत आहे, तसे त्याच्या पृष्ठभागावर 'लोबेट स्कार्प्स' नावाच्या उंचवटासदृश कडा तयार होत आहेत. या कडा म्हणजे पृष्ठभाग दाबला गेल्यामुळे तयार झालेले छोटे डोंगरच आहेत. यापूर्वी चंद्रावरील भूकंपांचे केंद्र केवळ डोंगराळ भागातील भेगांना मानले जात असे. मात्र, नवीन शोधामुळे आता संपूर्ण मैदानी प्रदेशातही भूकंपाचे स्रोत असू शकतात हे स्पष्ट झाले आहे. शास्त्रज्ञांच्या मते, या बदलांचा अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, कारण यामुळे चंद्रावर होणाऱ्या भूकंपांची नवीन केंद्रे शोधता येतील. भविष्यातील चांद्र मोहिमांसाठी सुरक्षित लँडिंग साइट निवडण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरणार आहे.