

लंडन : चंद्राला स्वतःचे प्रबळ चुंबकीय क्षेत्र होते की नाही, यावर गेल्या अनेक दशकांपासून शास्त्रज्ञांमध्ये वाद सुरू होता. मात्र, अपोलो मोहिमेदरम्यान आणलेल्या चंद्रावरील खडकांच्या ताज्या विश्लेषणामुळे या गूढ प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ‘नेचर जिओसायन्स’ या नियतकालिकात गुरुवारी (26 फेब्रुवारी) प्रसिद्ध झालेल्या एका शोधनिबंधातून ही माहिती समोर आली आहे.
ऑक्सफर्ड विद्यापीठातील भूविज्ञान विभागाच्या सहयोगी प्राध्यापिका आणि या संशोधनाच्या प्रमुख लेखिका क्लेअर निकोल्स यांनी सांगितले की, चंद्राच्या 4.5 अब्ज वर्षांच्या इतिहासात त्याचे चुंबकीय क्षेत्र बहुतेक काळ कमकुवतच होते. मात्र, सुरुवातीच्या काळात म्हणजे सुमारे 3.5 ते 4 अब्ज वर्षांपूर्वी काही विशिष्ट काळासाठी हे क्षेत्र अत्यंत प्रबळ झाले होते. ज्या खडकांमध्ये टायटॅनियमचे प्रमाण 6 टक्क्यांपेक्षा कमी होते, त्यांच्यामध्ये चुंबकीय क्षेत्र कमकुवत आढळले. याउलट, उच्च टायटॅनियमयुक्त खडकांमध्ये प्रबळ चुंबकीय शक्ती दिसून आली.
चंद्राच्या गाभ्यापाशी टायटॅनियमयुक्त खडक वितळल्यामुळे हे प्रबळ चुंबकीय क्षेत्र निर्माण झाले होते. हे क्षेत्र 5,000 वर्षांपेक्षा कमी काळासाठी किंवा कदाचित केवळ काही दशकांसाठीच अस्तित्वात होते. चंद्राच्या गाभ्याचा आकार त्याच्या त्रिज्येच्या केवळ 1/7 भाग असल्याने, तो प्रदीर्घ काळ प्रबळ चुंबकीय क्षेत्र टिकवून ठेवू शकत नाही, या दाव्याला या संशोधनाने पुष्टी दिली आहे. 1969 ते 1972 दरम्यान झालेल्या सहा अपोलो मोहिमांमध्ये चंद्राच्या विषुववृत्ताजवळील सपाट भागातून नमुने गोळा करण्यात आले होते. हे भाग प्राचीन काळी उल्कापातामुळे वितळलेल्या लाव्हापासून बनले होते आणि ते टायटॅनियमने समृद्ध होते.
‘नासा’च्या माहितीनुसार, पृथ्वीवर असलेल्या चंद्राच्या एकूण साठ्यापैकी सुमारे 382 किलो खडक हे अपोलो मोहिमेतून आलेले आहेत. शास्त्रज्ञांनी प्रामुख्याने या टायटॅनियमयुक्त खडकांचा अभ्यास केल्यामुळे पूर्वी असा समज निर्माण झाला होता की, चंद्रावर प्रबळ चुंबकीय क्षेत्र दीर्घकाळ अस्तित्वात होते. मात्र, नवीन विश्लेषणानुसार ती केवळ काही काळापुरती आलेली ‘लाट’ होती. या शोधामुळे चंद्राची अंतर्गत रचना आणि त्याच्या उत्क्रांतीचा प्रवास समजून घेण्यास मदत होणार आहे. चंद्राच्या इतिहासात चुंबकीय क्षेत्राचे स्वरूप नेमके कसे बदलत गेले, याचे स्पष्ट चित्र आता शास्त्रज्ञांसमोर आले आहे.