US exits WHO:
जिनिव्हा: अमेरिका अखेर जागतिक आरोग्य संघटनेतून (WHO) अधिकृतपणे बाहेर पडली आहे. अमेरिकेच्या आरोग्य आणि परराष्ट्र विभागाने यासंदर्भात अधिकृत घोषणा केली असून, या निर्णयाची अंमलबजावणी म्हणून जिनिव्हा येथील 'डब्ल्यूएचओ'च्या मुख्यालयाबाहेर असलेला अमेरिकेचा राष्ट्रध्वजही उतरवण्यात आला आहे.
अमेरिकेच्या आरोग्य विभागाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आमची निरीक्षक म्हणून सहभागी होण्याची किंवा भविष्यात पुन्हा या संघटनेत सामील होण्याची कोणतीही शक्यता नाही. अमेरिकेने स्पष्ट केले आहे की, रोगांचे निरीक्षण आणि इतर सार्वजनिक आरोग्य संबंधीत आम्ही आंतरराष्ट्रीय संघटनांऐवजी इतर देशांसोबत थेट काम करू. अमेरिकेच्या मते, हा निर्णय कोविड-19 महामारीच्या व्यवस्थापनात संयुक्त राष्ट्रांच्या या आरोग्य संस्थेचे अपयश दर्शवतो.
अमेरिकन कायद्यानुसार, संघटना सोडण्यासाठी एक वर्ष आधी सूचना देणे आणि सर्व थकबाकी भरणे आवश्यक आहे. WHO च्या मते, अमेरिकेवर २६ कोटी डॉलर्सची थकबाकी आहे. WHO च्या प्रवक्त्याने सांगितले होते की, अमेरिकेने २०२४ आणि २०२५ ची थकबाकी अद्याप भरलेली नाही. मात्र, अमेरिकन परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, अमेरिकन जनतेने आधीच पुरेसा पैसा भरला आहे. तसेच, संघटना सोडण्यापूर्वी थकबाकी भरणे अनिवार्य आहे अशी कोणतीही अट कायद्यात नसल्याचा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे. जॉर्जटाऊन युनिव्हर्सिटीच्या ओ'नील इन्स्टिट्यूट फॉर ग्लोबल हेल्थ लॉचे संस्थापक संचालक लॉरेन्स गोस्टिन यांनी म्हटले की, हे अमेरिकन कायद्याचे स्पष्ट उल्लंघन आहे, परंतु ट्रम्प यातून मार्ग काढण्याची दाट शक्यता आहे.
अमेरिकेच्या आरोग्य आणि मानव सेवा विभागाने घोषणा केली आहे की, सरकारने WHO ला दिला जाणारा निधी आता बंद केला आहे. HHS प्रवक्त्यानुसार, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आपल्या अधिकारांचा वापर करून WHO ला भविष्यात कोणत्याही अमेरिकन सरकारी संसाधनांचे हस्तांतरण करण्यावर बंदी घातली आहे. या संघटनेमुळे अमेरिकेचे अब्जावधी डॉलर्सचे नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या या निर्णयावर WHO च्या प्रवक्त्याने सांगितले की, फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत सदस्य देश अमेरिकेची माघार आणि त्याशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करतील.