US Pakistan Oil Deal
वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानसोबत महत्त्वाची ऑईल डील झाल्याची घोषणा केली आहे. या करारानुसार अमेरिका पाकिस्तानमधील तेल साठ्यांचा विकास करणार असून भविष्यात पाकिस्तान भारताला तेल विकेल, अशी शक्यता ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे.
बुधवारी सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी म्हटलं आहे की, “आम्ही पाकिस्तानसोबत एक करार अंतिम केला आहे, ज्याअंतर्गत दोन्ही देश मिळून त्यांच्या तेल साठ्यांचा विकास करतील. एका खासगी अमेरिकन तेल कंपनीला या भागीदारीसाठी निवडले जाईल. कदाचित एक दिवस ते भारतालाही तेल विकतील.”
विशेष म्हणजे, ट्रम्प यांचे हे वक्तव्य अशा वेळी आले आहे जेव्हा काही तासांपूर्वीच ट्रम्प यांनी भारतावर 25 टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली आहे.
तसेच ट्रम्प यांनी वारंवार ऑपरेशन सिंदूरनंतर भारत-पाकिस्तानातील संघर्ष मध्यस्थी करून थांबवल्याचा दावा केला आहे. तथापि, सरकारने मात्र ट्रम्प यांचे नाव घेतलेले नाही. विरोधी पक्षांनी यावरून केंद्र सरकारला, पंतप्रधानांना वारंवार स्पष्टीकरणही मागितले आहे.
पाकिस्तानच्या समुद्रकिनाऱ्यालगत 2024 च्या सप्टेंबरमध्ये मोठ्या प्रमाणात तेल आणि नैसर्गिक वायूचा साठा सापडला होता. पाकिस्तानी वृत्तसंस्था 'डॉन'च्या माहितीनुसार, एका परकीय देशाच्या मदतीने तीन वर्षे सर्वेक्षण झाल्यानंतर या साठ्याची पुष्टी झाली आहे.
या साठ्याचा दर्जा आणि प्रमाण पाहता, तो जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा तेल-गॅस साठा ठरू शकतो. याआधी व्हेनेझुएलाकडे सर्वाधिक तेल साठा आहे, तर अमेरिका सध्या स्वतःचा शुद्ध तेल साठा वापरत नाही.
या साठ्याचा अभ्यास पूर्ण करण्यासाठी सुमारे 42000 कोटी खर्च अपेक्षित आहे. त्यानंतर समुद्रातून तेल काढण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतील, असे रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. आवश्यक इन्फ्रास्ट्रक्चर उभारण्यासाठी आणखी गुंतवणूक लागेल.
पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी या साठ्याला ‘ब्लू इकॉनॉमी’साठी वरदान ठरवले आहे. समुद्री रस्त्यांमधून, बंदरविकास व सागरी धोरणांद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्याची संकल्पना ब्लू इकॉनॉमीमध्ये येते.
या डीलच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी भारतावर 1 ऑगस्टपासून 25 टक्के टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी म्हटले की, भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात सैन्य उपकरणे आणि ऊर्जा खरेदी करत आहे, म्हणून त्याला 'दंडात्मक टॅरिफ' भरावे लागतील.
त्यांनी पुढे लिहिले की, भारत आणि अमेरिकेमधील व्यापारी तफावत खूप जास्त आहे आणि ही तफावत कमी करण्यासाठी टॅरिफ लावणे आवश्यक आहे.
भारत सरकारने या निर्णयाची दखल घेतली असून, देशाच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात येतील असे सांगितले आहे.
पाकिस्तान सरकारने डोनाल्ड ट्रम्प यांचे 2026 च्या नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन केले आहे. पाकिस्तान सरकारने यापुर्वीच म्हटले आहे की, भारत-पाक संघर्षाच्या वेळी ट्रम्प यांनी मध्यस्थी करून दोन अण्वस्त्रधारी देशांमधील युद्ध टाळण्यात मदत केली.
जून महिन्यात ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांच्यासोबत बंद दारा आड महत्त्वपूर्ण बैठकही घेतली होती. शिवाय त्यांच्यासोबत लंचही केला होता.
दरम्यान, अमेरिका आणि पाकिस्तान यांच्यातील हा तेल करार भारतासाठी भू-राजकीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून महत्त्वाची असू शकते. पाकिस्तान जर स्वतःचे तेल बाजारात आणण्यात यशस्वी झाला, तर त्याचा प्रभाव संपूर्ण दक्षिण आशिया क्षेत्रावर पडू शकतो.