अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्‍प. Pudhari
आंतरराष्ट्रीय

US Iran War Updates : आज रात्री इराणवर अत्यंत जोरदार प्रहार करणार : अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्‍ड ट्रम्प यांचा इशारा

भविष्यात खार्ग बेट आणि तेलाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांचा ताबा घेण्‍याचा निर्धार

पुढारी वृत्तसेवा

US Iran War Updates: : अमेरिकेचे राष्‍ट्राध्‍यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी आज (दि. ११) इराणबरोबरील संघर्ष आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले आहेत. अमेरिका इराणवर "खूप जोरदार" हल्ला करेल, असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे.(US-Iran conflict) तसेच, भविष्यात 'खार्ग बेट' (Kharg Island) याच्यासह इराणच्या मुख्य तेल पायाभूत सुविधांवर अमेरिका पूर्ण नियंत्रण मिळवू शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.

तेलाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांचा ताबा घेऊ

सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म ट्रूथवर (Truth Social) केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये ट्रम्‍प यांनी म्‍हटलं आहे की, "अमेरिका आज रात्री इराणवर अत्यंत जोरदार प्रहार करणार आहे (ज्याचे नौदल, हवाई दल, रडार यंत्रणा, विमान-विरोधी संरक्षण आणि इतर सर्व प्रकारची संरक्षण व्यवस्था, तसेच आक्रमक क्षमतांचा मोठा भाग आता पूर्णपणे नष्ट झाला आहे!). नजीकच्या भविष्यात कधीतरी, आम्ही खार्ग बेट आणि तेलाशी संबंधित इतर पायाभूत सुविधांचा ताबा घेऊ; तसेच त्यांच्या तेल आणि वायू बाजारावर पूर्ण नियंत्रण मिळवू. आम्ही व्हेनेझुएलाच्या बाबतीत केले आहे. याचा व्हेनेझुएला व अमेरिका या दोघांनाही उत्कृष्ट लाभ होत आहे."

बहरीन, कुवेत आणि जॉर्डनवरील इराणी हल्ल्यांचा युएईकडून निषेध

संयुक्त अरब अमिरातीने (UAE) बहरीन, कुवेत आणि जॉर्डनवर इराणने केलेल्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला असून, हे हल्ले "शत्रुत्वपूर्ण" असल्याचे म्हटले आहे. 'एक्‍स' पोस्टमध्‍ये युएईच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे की, "हे शत्रुत्वपूर्ण हल्ले तिन्ही बंधू राष्ट्रांच्या सार्वभौमत्वाचे सरळ सरळ उल्लंघन असून त्यांच्या सुरक्षा आणि स्थिरतेसाठी मोठा धोका आहेत."

इराण आणि अमेरिकेने पुन्हा चर्चा सुरू करावी - तुर्की

तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हाकान फिदान यांनी अमेरिका आणि इराणला त्यांचे नवीन हल्ले थांबवण्याचे आणि या प्रदेशातील तणाव आणखी वाढू नये म्हणून पुन्हा चर्चेकडे वळण्याचे आवाहन केले आहे. सोफिया येथे बोलताना फिदान म्हणाले की, वॉशिंग्टन, तेहरान आणि मध्यस्थ देश असलेल्या पाकिस्तानच्या सतत संपर्कात असलेल्या तुर्कीने दोन्ही बाजूंना शांतता करारावर चर्चा पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला आहे.

अधिक तीव्रतेने प्रत्युत्तर देणार : इराण

अमेरिकेने इारणाचाआदर केला नाही तर हा संघर्ष असाच सुरू राहील, असा इशारा इराणच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे. सीएनएन (CNN) ने दिलेल्या वृत्तानुसार, मोहम्मद मोखबर यांनी सांगितले की, भविष्यात अमेरिकेने केलेल्या कोणत्याही हल्ल्याला इराण "अधिक तीव्रतेने आणि चोख" प्रत्युत्तर देईल. तसेच या युद्धाची पुढील दिशा अमेरिकेच्‍या कृतीवर अवलंबून असेल. अमेरिकेच्‍या हल्‍ल्‍यांना आम्ही अधिक तीव्रतेने आणि जोरदार प्रत्युत्तर देऊ. इस्लामिक रिपब्लिक (इराण) आपल्या स्वातंत्र्याशी आणि राष्ट्रीय हितसंबंधांशी अजिबात तडजोड करणार नाही किंवा पाठीमागे हटणार नाही. आणि आम्ही आक्रमकांना त्यांच्या कृतीबद्दल पश्चात्ताप करायला लावू."

मध्य पूर्वेतील लष्करी कारवाया थांबवाव्यात : चीनचे आवाहन

अमेरिकेने इराणवर केलेले हल्ले आणि त्याला इराणने दिलेल्या प्रत्युत्तरानंतर चीनने मध्य पूर्वेतील लष्करी कारवाया त्वरित थांबवण्याचे आवाहन केले आहे. एएफपी (AFP) च्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते लिन जियान माध्‍यमांशी बोलताना म्‍हणाले की, "चीन संबंधित देशांना लष्करी कारवाया त्वरित थांबवण्याचे, संवाद आणि चर्चेकडे परत येण्याचे, तसेच संबंधित देशांच्या मध्यस्थीच्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन लवकरात लवकर सर्वसमावेशक आणि कायमस्वरूपी युद्धबंदी लागू करण्याचे जोरदार आवाहन करत आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT