China’s Hidden Role in US-Iran Ceasefire: अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या शस्त्रसंधीवर सहमती झाल्यानंतर आता या संपूर्ण प्रक्रियेत चीनची पडद्यामागील भूमिका चर्चेत आली आहे. अधिकृतपणे काहीही न बोलता, चीनने शांतपणे या चर्चेत सहभागी होत मोठी भूमिका निभावली असल्याचं समोर आलं आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानने मध्यस्थी केली होती. मात्र, यामागे चीन सातत्याने इराणशी संपर्कात असल्याचे काही अहवालातून स्पष्ट झाले आहे. असोसिएटेड प्रेसशी बोलताना दोन चिनी अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीजिंगने थेट आणि अप्रत्यक्ष मार्गाने इराणवर चर्चा करण्यासाठी दबाव टाकला.
चीनने या प्रक्रियेत थेट भूमिका जाहीर केली नसली तरी, पाकिस्तानसह तुर्की आणि इजिप्तसारख्या देशांच्या माध्यमातून तो इराणशी संवाद साधत होता. म्हणजेच, चीनने स्वतः पुढे न येता ‘बॅकडोअर डिप्लोमसी’चा वापर केला, असे मानले जात आहे.
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या माओ निंग यांनीही सर्व पक्षांनी प्रामाणिकपणे युद्ध थांबवावे, असे आवाहन केले. त्यांनी या संघर्षाचा जागतिक अर्थव्यवस्था आणि ऊर्जा सुरक्षेवर होणाऱ्या परिणामाबद्दल चिंता व्यक्त केली.
दरम्यान, रशिया सोबत चीनने संयुक्त राष्ट्रांमध्ये एक महत्त्वाचा प्रस्तावही ठेवला आहे. हा प्रस्ताव स्ट्रेट ऑफ होर्मुजमधील व्यापारी जहाजांच्या सुरक्षेसाठीचा होता. मात्र, चीनचे संयुक्त राष्ट्रांतील प्रतिनिधी फू काँग यांनी सांगितले की, अशा परिस्थितीत हा प्रस्ताव चुकीचा संदेश देऊ शकतो.
या सर्व घडामोडींमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी शस्त्रसंधीची घोषणा केली. ही घोषणा अंतिम मुदतीच्या अवघ्या काही तास आधी करण्यात आली.
शहबाज शरीफ यांनी दोन्ही देशांच्या प्रतिनिधींना इस्लामाबादमध्ये चर्चेसाठी आमंत्रित केले असून, 10 एप्रिल रोजी या चर्चेची शक्यता आहे. महत्त्वाचे म्हणजे, शस्त्रसंधी जाहीर करण्यापूर्वी ट्रम्प यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी थेट चर्चा केली होती. या चर्चेनंतरच अंतिम निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.
इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागची यांनीही दोन आठवड्यांसाठी लष्करी कारवाई थांबवण्यास आणि स्ट्रेट ऑफ होर्मुज चालू करण्यास सहमती दर्शवली आहे.
एकूणच, अमेरिका-इराण शस्त्रसंधी ही फक्त दोन देशांमधील करार नसून, त्यामागे जागतिक राजकारणातील मोठे देश सक्रिय असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. चीनने अधिकृतपणे भूमिका न घेताही पडद्यामागे राहून मोठे निर्णय घेतल्याची चर्चा आंतरराष्ट्रीय स्तरावर रंगू लागली आहे.