अमेरिकेने मध्य पूर्वेमध्ये अतिरिक्त युद्धनौका आणि लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात केली आहे.  file photo
आंतरराष्ट्रीय

इराण- इस्रायल युद्धाच्या उंबरठ्यावर! अमेरिकेकडून मध्य पूर्वेत युद्धनौका तैनात

Iran Israel War | इराण इस्रायलवर हल्ल्याच्या तयारीत

दीपक दि. भांदिगरे

पुढारी ऑनलाईन डेस्क

हमासचे राजकीय नेते इस्माइल हनीयेह यांच्या हत्येचा बदला म्हणून इराण आणि त्याचे सहयोगी या आठवड्याच्या शेवटी इस्रायलवर आणखी एक हल्ला करण्याच्या तयारीत आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे जवान आणि इस्रायलच्या संरक्षणासाठी अमेरिकेने मध्य पूर्वेमध्ये (Middle East) अतिरिक्त युद्धनौका आणि लढाऊ विमाने तैनात करण्यास सुरुवात केली आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नलने दिले आहे. (Iran Israel War)

जर इराणकडून हल्ला झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी अतिरिक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्र, संरक्षण सक्षम क्रूझर्स आणि विनाशकांचीही व्यवस्था केली जात आहे, असे एपीने पेंटागॉनच्या अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.

इराण इस्रायलवर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत

ज्यो बायडेन प्रशासनाला माहिती मिळाली आहे की या आठवड्याच्या शेवटी इराण इस्रायलवर हल्ला करु शकते, असे वृतात म्हटले आहे. हा हल्ला १३ एप्रिलच्या हल्ल्यापेक्षा अधिक व्यापक आणि अधिक घातक असू शकतो; जो सीरियातील एका हवाई हल्ल्याचा बदला म्हणून केला होता. इस्रायलच्या हल्ल्यात इराणचा सर्वोच्च जनरल ठार झाल्यानंतर इराणकडून हा हल्ला करण्यात आला होता.

हिजबुल्लाकडून बदला घेण्याची धमकी

हिजबुल्लाचा नेता हसन नसराल्लाह याने या आठवड्याच्या सुरुवातीला बेरूतमध्ये इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्याचा बदला घेणार असल्याचा इशारा दिला आहे. इस्त्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यात कमांडर फुआद शुक्र ठार झाला होता.

Iran Israel tension : आतापर्यंत नेमके काय घडले?

दमास्कसमधील इराणी वाणिज्य दूतावासावर इस्रायलने हवाई हल्ला केला होता; यात एका उच्च कमांडरसह सात लोक ठार झाले होते. या हल्ल्याचा बदला म्हणून ४ महिन्यांपूर्वी १३ एप्रिल रोजी इराणने इस्रायलच्या दिशेने क्षेपणास्त्र डागले होते. त्यावेळी इस्रायलला जॉर्डन आणि सौदी अरेबियासह अनेक अरब देशांचे समर्थन मिळाले होते. त्यांनी इराणी आणि हुथी ड्रोन पाडण्यास मदत केली होती. त्यांनी अमेरिका आणि इस्रायलला इराणचा क्षेपणास्त्र हल्ला रोखण्यासाठी त्यांच्या हवाई क्षेत्राचा वापर करण्यास परवानगी दिली होती.

आता अमेरिकेला मदत मिळण्याची शक्यता कमी

दरम्यान, यावेळी अमेरिकेला सहकार्य मिळण्याची शक्यता कमी वाटते. कारण सध्याचे तणावाचे वातावरण हे हमास नेते हनीयेहच्या हत्येशी संबंधित आहे, ज्याचा संपूर्ण मध्य पूर्व प्रदेशात तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे, असे एक्सिओसच्या वृत्तात नमूद करण्यात आले आहे. इराणची राजधानी तेहरानमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात हमासच्या राजकीय ब्युरोचा प्रमुख इस्माइल हनीयेह (Ismail Haniyeh) ठार झाला होता. या घटनेची पुष्टी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) केली होती.

इस्रायलकडे ये-जा करणारी हवाई वाहतूक स्थगित

मध्य पूर्वेतील प्रादेशिक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियासह अनेक अमेरिकेच्या आणि आंतरराष्ट्रीय विमान कंपन्यांनी इस्रायलकडे ये-जा करणारी विमान सेवा स्थगित केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT