इराणची राजधानी तेहरानमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या हल्ल्यात हमासच्या राजकीय ब्युरोचा प्रमुख इस्माइल हनीयेह (Ismail Haniyeh) ठार झाला आहे. या घटनेची पुष्टी इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सने (IRGC) केली असल्याचे वृत्त प्रेस टीव्हीने दिले आहे. मेहेर न्यूज एजन्सीला दिलेल्या निवेदनात आयआरजीसीने म्हटले आहे की इस्माइल हनीयेह आणि त्यांच्या एका अंगरक्षकाचा हल्ल्यात मृत्यू झाला आहे. तेहरानमधील त्यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करण्यात आल्यानंतर ही घटना घडली. दरम्यान, हमासने हनीहेय यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. या हल्ला इस्रायलने घडवून आणल्याचा दावा हमासने केला आहे. 'आता भ्याड कृत्य केल्याशिवाय राहणार नाही' अशी धमकी हमासने दिली आहे. (Israel Hamas War)
याआधी मंगळवारी इराणचे सर्वोच्च नेते सय्यद अली होसेनी खामेनी यांची हमास प्रमुख इस्माइल हनीयेह यांच्याशी बैठक झाली होती. X वरील एका पोस्टमध्ये, खामेनेई यांच्या कार्यालयाने सांगितले होते की, "इमाम खामेनेई यांनी पॅलेस्टिनी इस्लामिक रेझिस्टन्स मूव्हमेंट हमासच्या राजकीय ब्युरोचे प्रमुख इस्माइल हनीयेह आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहाद चळवळीचे सरचिटणीस झियाद अल-नखलाह यांची भेट घेतली."
प्रेस टीव्हीच्या वृत्तानुसार, इराणचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांच्या शपथविधी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी कतारमध्ये राहणारे इस्माइल हनीयेह तेहरानमध्ये आले होते. एप्रिलच्या सुरुवातीला, इस्रायली हवाई दलाने केलेल्या हवाई हल्ल्यात हमासचे राजकीय नेते इस्माइल हनीयेह यांचे तीन मुलगे ठार झाले होते, अशी माहिती इस्रायलच्या संरक्षण दलाने (आयडीएफ) दिली होती. इस्रायली सैन्याने या घटनेची पुष्टी केली होती. हमासच्या लष्करी शाखेतील सेल कमांडर अमीर हनीयेह आणि मोहम्मद आणि हाझेम हनीयेह अशी इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या तीन मुलांची नावे होती.
इस्त्रायल संरक्षण दलाने (आयडीएफ) लेबनीज दहशतवादी गट हिजबुल्लाहचा सर्वोच्च कमांडर फुआद शुक्र याला ठार मारल्याचा दावा केल्याच्या एका दिवसानंतर ही घडना घडली आहे. इस्रायलच्या ताब्यात असलेल्या गोलान हाइट्समध्ये १२ मुलांचा मृत्यू झालेल्या ड्रोन हल्ल्यामागे फुआद शुक्र यांचा हात होता, असा इस्रायलचा दावा आहे.
इस्रायलने ७ ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर हानिया आणि इतर हमास नेत्यांना ठार मारण्याची शपथ घेतली होती. या हल्ल्यात १,२०० इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाला होता आणि २५० लोकांना ओलीस ठेवण्यात आले होते.