प्रतिकात्‍मक छायाचित्र.  Pudhhari
आंतरराष्ट्रीय

US attack Strait of Hormuz : होर्मुझजवळ जहाजावर अमेरिकेचा हल्ला: दोन भारतीय खलाशांचा मृत्यू, चीफ इंजिनिअर अद्याप बेपत्ता

होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद : इराणची घोषणा

पुढारी वृत्तसेवा

US attack Strait of Hormuz : होर्मुझ सामुद्रधुनीजवळ व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात दोन भारतीय खलाशांचा मृत्यू झाला असून, चीफ इंजिनिअर अद्याप बेपत्ता आहे. 'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया' (FSUI) ने गुरुवारी ही माहिती दिली. आखाती देशांमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत यामुळे पुन्हा एकदा गंभीर चिंता निर्माण झाली आहे. दरम्‍यान, अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडून हॉर्मुझ सामुद्रधुनी सील केली आहे.

जहाज ओमानच्या आखातातून जात असताना हल्ला

पलाऊचा ध्वज असलेले 'एमटी सेटबेलो' जहाज ओमानच्या आखातातून जात असताना हा हल्ला झाला. या जहाजावर २४ भारतीय कर्मचारी होते. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) माहितीनुसार, २१ कर्मचाऱ्यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे, तीन कर्मचारी बेपत्ता असल्याची नोंद होती. ओमानच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने शोध आणि बचाव कार्य अद्याप सुरू आहे.

ते जहाज प्रतिबंधित केलेल्‍या जहाजांच्‍या यादी नव्‍हते

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षामुळे जागतिक जहाजांच्या वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला होर्मुझ सामुद्रधुनीचा परिसर सध्या कमालीचा संवेदनशील बनला आहे. विशेष म्हणजे, ज्या 'एमटी सेटबेलो' जहाजावर हल्ला झाला, ते अमेरिकन अधिकाऱ्यांनी प्रतिबंधित केलेल्या किंवा काळ्या यादीत टाकलेल्या जहाजांच्या यादीत नव्हते, अशी माहिती समोर आली आहे.

होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद : इराणची घोषणा

इराणच्या सर्वोच्च संयुक्त लष्करी कमांडने होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद केल्याची घोषणा केली आहे. तेलवाहू जहाजे आणि व्यापारी जहाजांसह, या जलमार्गातून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या जहाजावर हल्ला केला जाईल, असा इशारा इराणने दिला आहे. या घोषणेमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठा आणि ऊर्जा क्षेत्रात चिंता वाढली आहे.

'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया'ने व्यक्त केली चिंता

'एएनआय'शी बोलताना 'फॉरवर्ड सीमेन्स युनियन ऑफ इंडिया'चे सरचिटणीस मनोज यादव यांनी सांगितले की, जहाजाशी असलेला संपर्क अद्याप तुटलेला असल्यामुळे सर्व तपशिलांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नाही. आमचा जहाजाशी संपर्क होऊ शकलेला नाही. मला मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, दोघांचा मृत्यू झाला असून मुख्य अभियंता अजूनही बेपत्ता आहेत. तिन्ही कर्मचारी हिमाचल प्रदेश, देवरिया (उत्तर प्रदेश) आणि आंध्र प्रदेश येथील आहेत," असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

परराष्‍ट्र मंत्रालयाकडून हल्ल्याचा निषेध

यापूर्वी, परराष्ट्र मंत्रालयाने 'एमटी सेटबेलो'वरील हल्ल्याचा तीव्र निषेध केला होता आणि ओमानमधील भारतीय दूतावास परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे सांगितले होते.मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, "ओमानच्या किनारपट्टीवर 'सेटबेलो' या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो. जहाजावरील २४ भारतीय कर्मचाऱ्यांपैकी २१ जणांना आतापर्यंत वाचवण्यात आले असून ३ भारतीय बेपत्ता आहेत. ओमानमधील आमचे दूतावास परिस्थितीवर लक्ष ठेवून असून शोध मोहिमेसाठी ओमानच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय साधत आहे."

भारताने नोंदवला तीव्र आक्षेप

दरम्यान, या हल्ल्याविरोधात भारताने अधिकृतपणे तीव्र निषेध नोंदवला आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव (अमेरिका) नागराज नायडू यांनी अमेरिकेचे प्रभारी राजदूत जेसन मीक्स यांना समन्स बजावून या हल्ल्याबाबत औपचारिक 'डेमार्श' (निषेधपत्र) सुपूर्द केले.भारतीय खलाशी असलेली व्यापारी जहाजे या संघर्षात विनाकारण होरपळली जात असल्याबद्दल भारतीय अधिकाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

अमेरिकेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह

FSUI चे सरचिटणीस मनोज यादव यांनी अमेरिकेच्या या लष्करी कारवाईवर प्रश्न उपस्थित केले आहेत. जहाजावर कोणत्या देशाचे नागरिक आहेत, याची पूर्ण कल्पना अमेरिकन अधिकाऱ्यांना असण्याची दाट शक्यता असताना, अशी कारवाई करण्यापूर्वी इतर पर्यायांचा विचार का केला गेला नाही? असा सवाल त्यांनी केला. "त्या जहाजांवर कोणत्या देशाचे लोक आहेत, याची माहिती अमेरिकेकडे नव्हती, यावर माझा अजिबात विश्वास नाही. हे शक्यच नाही. अमेरिकन नौदलाला त्या जहाजांवर किती भारतीय आणि इतर परदेशी नागरिक आहेत, याची १००% अचूक माहिती होती. जर जहाजांनी त्यांच्या सूचनांचे पालन केले नव्हते, तर त्यांना ताब्यात घेणे हा एक चांगला पर्याय उपलब्ध होता," असेही यादव म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT