cancer risk unmarried men women
वॉशिंग्टन: समाजातील बदलती जीवनशैली, करिअरकेंद्री विचारसरणी आणि वैयक्तिक स्वातंत्र्याला मिळालेलं महत्त्व यामुळे अनेक जण लग्नच न करण्याचा पर्याय निवडतात. एकेकाळी विशी ओलांडली की, घरात लग्नाचा विषय निघायचाच. तिशी गाठली की ‘आता तरी बघा’ असा दबाव वाढायचा; पण आज चित्र बदलताना दिसत असतानाच एका खळबळजनक संशोधनाने जगभरातील अविवाहितांची चिंता वाढवली आहे.
अमेरिकेतील १२ राज्यांमध्ये ४० लाखांहून अधिक प्रौढांच्या आरोग्याचा अभ्यास केल्यानंतर एक धक्कादायक निष्कर्ष समोर आला आहे. विवाहित व्यक्तींच्या तुलनेत अविवाहित राहणाऱ्या व्यक्तींमध्ये कर्करोगाचा धोका तब्बल ८५ टक्क्यांपर्यंत जास्त असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे.
काही तरुण-तरुणी स्पष्टपणे सांगतात की, त्यांना लग्न करायचेच नाही. त्यांना सिंगल राहणे अधिक सोयीचे आणि आनंददायी वाटते. करिअर, प्रवास, छंद, सामाजिक काम या गोष्टींमध्ये त्यांना समाधान मिळते. समाजात अजूनही लग्न न करणाऱ्यांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते; पण सध्या चॉईस म्हणून सिंगल राहणे स्वीकारले जाऊ लागले असतानाच, जगभरातील 'सिंगल्स'ची झोप उडवणारा हा अहवाल समोर आला आहे.
'युएस'मधील २०१५ ते २०२२ या कालावधीतील आकडेवारीचे विश्लेषण केल्यावर संशोधकांना असे आढळले की, वैवाहिक स्थितीचा थेट परिणाम मानवी आरोग्यावर होतो. कधीही लग्न न केलेल्या पुरुषांमध्ये, विवाहित पुरुषांच्या तुलनेत कॅन्सरचा धोका ७० टक्के जास्त आहे. मात्र, महिलांच्या बाबतीत हा आकडा अधिक असून, अविवाहित महिलांमध्ये हा धोका विवाहित महिलांच्या तुलनेत ८५ टक्क्यांनी अधिक असल्याचे दिसून आले आहे. लग्न केल्याचा फायदा केवळ पुरुषांनाच होतो, हा जुना समज या संशोधनाने मोडीत काढला आहे.
संशोधनानुसार, वयाची ५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर अविवाहित आणि विवाहित व्यक्तींमधील आरोग्याचा हा फरक अधिक स्पष्टपणे जाणवू लागतो. याचे मुख्य कारण म्हणजे अनेक दशकांपासून जोपासलेल्या जीवनशैलीच्या सवयी. जे लोक एकटे राहतात, त्यांच्यामध्ये आहार आणि व्यायामाबाबत अनियंत्रितपणा, धूम्रपान आणि मद्यपानाचे वाढते प्रमाण, नियमित आरोग्य तपासणीकडे होणारे दुर्लक्ष, या सवयींमुळे उतारवयात कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण मिळते.
या अभ्यासात प्रामुख्याने ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (HPV) मुळे होणाऱ्या कर्करोगावर अभ्यास करण्यात आला. आकडेवारीनुसार, अविवाहित पुरुषांमध्ये गुदद्वाराचा कर्करोगचा धोका विवाहित पुरुषांच्या तुलनेत ५ पटीने जास्त आहे. अविवाहित महिलांमध्ये गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण विवाहित महिलांच्या तुलनेत ३ पटीने जास्त आढळले. वेळेवर लसीकरण आणि जोडीदाराच्या पाठपुराव्यामुळे विवाहित व्यक्तींमध्ये या आजारांचे निदान लवकर होते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
विवाहित व्यक्तींमध्ये कॅन्सरचा धोका कमी असण्यामागे काही सामाजिक आणि आर्थिक कारणे असल्याचे संशोधकांनी सांगितले आहे. जोडीदाराकडून मिळणारा मानसिक पाठिंबा तणाव कमी करण्यास मदत करतो. आजारपणाच्या सुरुवातीच्या लक्षणांकडे लक्ष देणे आणि डॉक्टरांकडे जाण्यासाठी जोडीदाराकडून मिळणारे प्रोत्साहन महत्वाचे ठरते. विवाहित जोडप्यांकडे अनेकदा सामायिक आरोग्य विमा आणि उत्तम आर्थिक संसाधने उपलब्ध असतात, ज्यामुळे उपचारांमध्ये सुलभता येते.
"आपले आरोग्य केवळ नशीब किंवा जनुकांवर अवलंबून नसते, तर आपल्या सभोवतालची माणसे आपली किती काळजी घेतात, यावरही ते तितकेच अवलंबून असते. सामाजिक सुरक्षितता आणि भक्कम नातेसंबंध कर्करोगासारख्या आजारांविरुद्ध 'ढाल' म्हणून काम करतात," असे मत आरोग्य तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.