पुढारी वृत्तसेवा
स्तनाच्या कर्करोगाचा केवळ स्त्रियांना धोका नसून पुरुषांनाही असतो, ही बाब आता समोर आली आहे.
महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये याची रुग्णसंख्या कमी असली, तरी या आजाराचे स्वरूप अत्यंत घातक ठरू शकते. अनेकदा पुरुष सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, ज्यामुळे हा आजार जीवघेणा ठरतो.
पुरुषांच्या शरीरातही निप्पलच्या आसपास कमी प्रमाणात का असेना, पण 'ब्रेस्ट टिश्यू' असतात. त्यामुळे महिलांप्रमाणेच त्यांनाही या पेशींमध्ये कर्करोग होण्याचा धोका असतो.
साधारणपणे १००० पुरुषांमागे एकाला हा आजार होण्याची शक्यता असते. संप्रेरकांमधील असमतोल, शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढणे, अनुवांशिकता, लठ्ठपणा आणि अंडकोषांचे आजार ही यामागची प्रमुख कारणे मानली जातात.
सुरुवातीची ४ लक्षणे
१. निप्पलचा आकार बदलणे किंवा ते आतल्या बाजूला ओढले जाणे. तसेच, निप्पलच्या मागे एखादी गाठ येणे. या गाठीमध्ये सहसा वेदना होत नसल्याने अनेक जण याकडे दुर्लक्ष करतात.
२. स्तनाच्या वरची त्वचा जाड होणे, त्यावर खड्डे पडणे किंवा सतत लालसरपणा जाणवणे हे कर्करोगाचे लक्षण असू शकते.
३. कर्करोगाचा प्रसार झाल्यास लिम्फ नोड्सवर परिणाम होतो. त्यामुळे काखेमध्ये किंवा कॉलरबोनच्या आसपास गाठ किंवा सूज आल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा.
४. आजार बळावल्यास निप्पल मधून रक्त किंवा पाणी येणे, तसेच तिथे न भरणारी जखम होणे अशी लक्षणे दिसतात.
पुरुषांमधील या कर्करोगाच्या निदानासाठी महिलांप्रमाणेच फिजिकल एक्झामिनेशन, मॅमोग्राफी, अल्ट्रासाऊंड आणि बायोप्सी या चाचण्या केल्या जातात.
उपचारांसाठी शस्त्रक्रिया (सर्जरी), रेडिएशन थेरपी, कीमोथेरपी आणि हार्मोन थेरपीचा वापर केला जातो.