प्रतीकात्मक छायाचित्र. AI-generated image.
आंतरराष्ट्रीय

UAE action on fake War videos | खोडसाळपणा नडला! इराण युद्धाचे बोगस व्‍हिडिओ पोस्‍ट करणार्‍या १९ भारतीयांवर UAEची मोठी कारवाई

UAE action on fake War videos | एकूण ३५ जणांना अटकेचे आदेश, सर्वांवर चालणार जलद गतीने खटला

पुढारी वृत्तसेवा

UAE Fake War Video Crackdown

दुबई: अमेरिका-इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर मध्यपूर्व आशियात युद्धाचा भडका उडला आहे. या युद्धाचे सोशल मीडियावर दिशाभूल करणारे आणि बनावट व्हिडिओ पोस्ट केल्याबद्दल संयुक्त अरब अमिराती (UAE) सरकारने १९ भारतीयांसह एकूण ३५ जणांच्‍या अटकेचे आदेश दिले आहेत. संशयितांनी युद्धाचा फायदा घेत चुकीची माहिती देणारे व्हिडिओ पसरवल्याचे तपासात निष्पन्न झाले असून, त्यांच्यावर जलद गतीने खटला चालवला जाणार आहे. ही कारवाई दोन टप्प्यांत करण्यात आली. पहिल्या टप्प्यात शनिवारी १० जणांविरुद्ध (ज्यात २ भारतीय होते) आदेश काढण्यात आले होते. त्यानंतर आता १७ भारतीयांसह २५ जणांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

बोगस माहिती रोखण्‍यासाठी सरकार ॲक्‍शन मोडमध्‍ये

युएईचे ॲटर्नी जनरल डॉ. हमद सैफ अल शम्सी यांनी सांगितले की, सार्वजनिक सुव्यवस्था बिघडवणे, अस्थिरता निर्माण करणारे बनावट माहिती रोखण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर कडक देखरेख ठेवली जात आहे. UAE च्या अधिकृत वृत्तसंस्थेनुसार WAMने दिलेल्‍या वृत्तात म्‍हटलं आहे की, या प्रकरणी तपासात असे समोर आले आहे की आरोपींनी तीन वेगवेगळ्या प्रकारे गुन्हे केले. यामध्‍ये सध्‍याच्‍या सुरु असणार्‍या घडामोडींचे वास्तविक व्हिडिओ चुकीच्या संदर्भाने वापरणे, AI (कृत्रिम बुद्धिमत्ता)चा वापर करुन बनावट व्हिडिओ तयार करणे आणि लष्करी आक्रमक कृती करणाऱ्या देशाचे समर्थन आणि त्यांच्या नेतृत्वाचे उदात्तीकरण करणे, आदी गुन्‍ह्यांखाली ही कारवाई करण्‍यात आली आहे.

देशाच्या संरक्षण क्षमतेची माहिती शत्रूंपर्यंत पोहोचण्याचा धोका

संयुक्त अरब अमिराती सरकारने युद्‍धाच्‍या बोगस व्‍हिडिओ व्‍हायरल केल्‍याप्रकरणी शनिवारी दहा जणांना अटक केली. यामध्‍ये ५ भारतीयांचा समावेश आहे. त्‍यांच्‍यावर देशाच्या हवाई हद्दीतील क्षेपणास्त्रे पाडल्याचे व्हिडिओ टिपणे. त्‍यानंतर भीती पसरवणारे आवाज आणि कमेंट्स टाकून ते व्हायरल करण्‍याचा आरोप आहे. त्‍यांच्‍या कृत्‍यामुळे यामुळे देशाच्या संरक्षण क्षमतेची माहिती शत्रूंपर्यंत पोहोचण्याचा धोका निर्माण झाला असल्‍याचेही सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

जुन्या घटनांचे व्हिडिओ युएईमधील असल्याचे सांगून शेअर केले

AI द्वारे तयार केलेले स्फोटांचे बनावट व्हिडिओ किंवा परदेशातील जुन्या घटनांचे व्हिडिओ युएईमधील असल्याचे सांगून शेअर केल्‍या प्रकरणी सात जणांना अटक करण्‍यात आली आहे. यामध्‍ये ५ भारतीयांचा समावेश आहे. विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी त्यांनी या व्हिडिओंमध्ये राष्ट्रीय ध्वज आणि तारखांचा वापर केला होता, असेही सरकारने स्‍पष्‍ट केले आहे.

इराणचे उदात्तीकरण केल्‍याचा आरोप

५ भारतीयांसह सहा जणांनी 'शत्रू राष्ट्र' (इराण) आणि त्यांच्या लष्करी कारवायांचे उदात्तीकरण केल्याचा आरोप आहे. यामुळे राष्ट्रीय हितसंबंधांना बाधा पोहोचल्याचे सरकारने म्हटले आहे.या व्यतिरिक्त इतर दोन भारतीयांवरही अशाच प्रकारच्या गुन्ह्यांसाठी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

किती शिक्षा होणार?

संयुक्त अरब अमिरातीमधील कायद्यानुसार, अशा प्रकारच्या गुन्ह्यांसाठी किमान १ वर्षाचा कारावास आणि किमान १,००,००० दिराम (अंदाजे २३ लाख रुपये) दंडाची तरतूद आहे. ॲटर्नी जनरल शम्सी म्हणाले की, "काही व्हिडिओंमध्ये मुलांच्या भावनांचा गैरवापर करून सुरक्षेला धोका असल्याचे भासवले गेले असून हे अत्यंत गंभीर आहे."

इराणच्‍या धमकीनंतर युएईमध्‍ये तणाव वाढला

इराणने युएईमधील तीन प्रमुख बंदरे रिकामी करण्याचा इशारा दिल्यानंतर आणि शेजारील देशांच्या मालमत्तांना लक्ष्य करण्याची धमकी दिल्यानंतर तणाव वाढला आहे. अमेरिका युएईमधील बंदरांचा वापर इराणच्या तेल निर्यात केंद्रांवर (खर्ग बेट) हल्ले करण्यासाठी करत आहे, असा आरोप इराणने केला आहे. दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्रराष्ट्रांना 'हॉर्मुझची सामुद्रधुनी' सुरक्षित करण्यासाठी युद्धनौका पाठवण्याचे आवाहन केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT