चीनमधील शेन्झेन येथे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या या ऐतिहासिक भेटीनंतर ‘शांततेच्या दिशेने रशिया-चीन-अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा जाहीरनामा’ प्रसिद्ध करण्यात आला. 
आंतरराष्ट्रीय

Shenzhen Summit : चीनमध्ये तीन महासत्तांचे 'महामंथन' : ट्रम्प, जिनपिंग आणि पुतीन यांच्यात चार मुद्द्यांवर एकमत

त्रिपक्षीय शिखर परिषदेनंतर रशिया, चीन आणि अमेरिकेने संयुक्त जाहीरनामा स्वीकारला

पुढारी वृत्तसेवा

Trump Xi Jinping Putin Trilateral Summit : चीनमधील शेन्झेन येथे पार पडलेल्या त्रिपक्षीय शिखर परिषदेनंतर रशिया, चीन आणि अमेरिकेने संयुक्त जाहीरनामा स्वीकारला आहे. आज (दि. १९ नोव्‍हेंबर)शेन्झेन येथे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात झालेल्या या ऐतिहासिक भेटीनंतर ‘शांततेच्या दिशेने रशिया-चीन-अमेरिका राष्ट्राध्यक्षांचा जाहीरनामा’ प्रसिद्ध करण्यात आला.

महत्त्वाच्या मुद्द्यांवर कटिबद्धता व्यक्त

संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा घडवून आणणे, रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन आणि पुरवठा वाढवणे, तसेच अण्वस्त्रविषयक जोखमी कमी करण्यावर चर्चा करणे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर यामध्ये कटिबद्धता व्यक्त करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सखोल चर्चा

जाहीरनाम्यानुसार, तिन्ही नेत्यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सखोल चर्चा केली असून धोरणात्मक स्थैर्य आणि आंतरराष्ट्रीय सुरक्षा अबाधित राखण्याचा निर्धार केला आहे. या त्रिपक्षीय शिखर परिषदेचे यशस्वी आयोजन केल्याबद्दल रशियन आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्षांनी चीनचे कौतुकही केले.

संयुक्त राष्ट्रांत सुधारणा आणि ऊर्जा सुरक्षेला प्राधान्य

जाहीरनाम्यात नमूद केल्यानुसार, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे कायमस्वरूपी सदस्य या नात्याने रशिया, चीन आणि अमेरिकेने संयुक्त राष्ट्रांमध्ये सुधारणा करण्याचा संकल्प केला आहे, जेणेकरून जागतिक आव्हानांचा अधिक प्रभावीपणे सामना करता येईल.

ऊर्जेचा सुरळीत पुरवठा टिकवून ठेवण्याचे महत्त्व

सर्व देशांच्या हितासाठी रिफाइंड पेट्रोलियम उत्पादनांचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्यावर तिन्ही देश सहमत झाले असून, जागतिक पातळीवर ऊर्जेचा सुरळीत पुरवठा टिकवून ठेवण्याचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे.कायदेशीर बाबींबाबत बोलताना, राज्याच्या संमतीचे तत्त्व आणि शासकीय अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या संरक्षण व सवलतींचा आदर राखण्याचे महत्त्व नेत्यांनी मान्य केले.आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालय (आयसीसी) आणि तत्सम संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्राचा गैरवापर करू नये, यावरही तिन्ही नेत्यांचे एकमत झाले.

अण्वस्त्र जोखमींवर चर्चेसाठी तिन्ही नेते तयार

अण्वस्त्र युद्ध कधीही जिंकले जाऊ शकत नाही आणि ते कधीही लढले जाऊ नये, याचा पुनरुच्चार जाहीरनाम्यात करण्यात आला आहे. अण्वस्त्रविषयक जोखमी कमी करणे आणि अण्वस्त्रांचा प्रसार रोखणे, या मुद्द्यांवर तिन्ही देश संवाद साधतील, असेही यात स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT