

BRICS Summit China Kapil Sibal
नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : नवी दिल्लीत पार पडलेल्या 'ब्रिक्स' शिखर परिषदेत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर सर्वसंमती घडवून आणणे हे भारतापुढील मोठे आव्हान होते; मात्र कोणताही विवाद न होता संयुक्त जाहीरनाम्यास मंजुरी मिळवून देणे ही भारताची मोठी कामगिरी आहे. असे असले तरी, या परिषदेचा खरा राजकीय व धोरणात्मक फायदा चीनलाच झाला आहे, असा दावा राज्यसभेचे खासदार व माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी केला आहे.
कपिल सिब्बल यांनी सोमवारी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, ब्रिक्स हा भिन्न हितसंबंध असलेल्या देशांचा गट असल्याने येथे ठोस राजकीय निर्णयांवर एकमत होणे सोपे नव्हते. भारतासाठी ही स्थिती 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून मार्ग काढण्यासारखी' कठीण होती. चीन आणि रशिया ब्रिक्सला पाश्चात्य देशांचा पर्याय म्हणून उभे करू इच्छितात, परंतु भारताला अशा कोणत्याही पाश्चात्यविरोधी गटाचा भाग व्हायचे नाही. रशिया, भारत आणि चीन (RIC) ही जुनी संकल्पना आता व्यवहारत: रशिया, इराण आणि चीन यांच्यातील वाढत्या सहकार्याकडे झुकताना दिसत आहे.
ब्रिक्स सदस्यांची परराष्ट्र धोरणे भिन्न आहेत. रशियावर पाश्चात्य निर्बंध आहेत, चीनसोबत भारताचा सीमावाद आहे, तर पश्चिम आशियात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने ठराव करणे शक्य नव्हते. म्हणूनच जाहीरनाम्यात चर्चेद्वारे आणि मुत्सद्देगिरीने मार्ग काढण्यावर भर देण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या परिषदेत कोणत्याही पर्यायी चलनाची (डी-डॉलरायझेशन) घोषणा न होणे हे भारताचे मोठे यश आहे. अमेरिकन डॉलरला पर्याय उभा केला असता, तर ब्रिक्सचे स्वरूप पूर्णपणे पाश्चात्यविरोधी बनले असते आणि भारताच्या अडचणी वाढल्या असत्या. तसेच, जाहीरनाम्यात फलोस्तीन आणि 'द्वि-राष्ट्र' समीकरणाचा उल्लेख बदलत्या जागतिक भू-राजकारणाचे संकेत देतो.
कपिल सिब्बल यांनी जाहीरनाम्याच्या प्रत्यक्ष अमलबजावणीवर शंका उपस्थित केली. अनेकदा अशा घोषणा केवळ कागदावरच राहतात आणि त्यांची खरी परीक्षा प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या वेळी होते, असे ते म्हणाले. या परिषदेत जागतिक व्यापार, पुरवठा साखळी (सप्लाय चेन), स्टार्टअप्स आणि संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण या विषयांवरही संमती झाली आहे. भिन्न हितसंबंध असलेल्या देशांना एका संयुक्त जाहीरनाम्यावर एकत्र आणणे हे भारताचे यश असले, तरी धोरणात्मक दृष्टीने चीन या परिषदेत सर्वात मोठा लाभार्थी ठरला आहे, असा पुनरुच्चार त्यांनी केला.