अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्‍हा एकदा इराणला इशारा दिला आहे.  pudhari photo.
आंतरराष्ट्रीय

Donald Trump Iran warning | "... तर परतीचा कोणताही मार्ग उरणार नाही" : युद्धविराम प्रस्तावावरून ट्रम्प यांचा इराणला इशारा

Donald Trump Iran warning | इराण लष्करीदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump Iran warning

वॉशिंग्टन : मध्यपूर्वेतील संघर्ष संपवण्यासाठी अमेरिकेने इराणसमोर १५ कलमी प्रस्ताव ठेवला आहे. मात्र इराणनेही आपल्‍या अटींवर युद्धविराम होईल, असे स्‍पष्‍ट केले आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील मतभेद टोकाचे असून, दोन्ही बाजू आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला थेट इशारा दिलाअसून, युद्धविराम प्रस्तावाबाबत गांभीर्याने विचार करण्‍याचे आवाहन केले आहे.

वाटाघाटी करणारे इराणी खूप वेगळे आणि विचित्र

ट्रम्प यांनी आपल्या 'ट्रुथ सोशल' पोस्टमध्ये इराणच्या भूमिकेवर कडाडून टीका केली. त्यांनी लिहिले, "इराणी वाटाघाटी करणारे लोक खूप वेगळे आणि 'विचित्र' आहेत. ते आम्हाला करार करण्यासाठी 'विनवणी' करत आहेत. ते लष्करीदृष्ट्या उद्ध्वस्त झाले आहेत. त्यांच्या पुनरागमनाची कोणतीही शक्यता नाही. असे असूनही ते जाहीरपणे सांगत आहेत की ते फक्त आमच्या प्रस्तावाचा 'विचार' करत आहेत. हे पूर्णपणे चुकीचे आहे!"

"... तर परतीचा कोणताही मार्ग उरणार नाही"

"वेळ संपण्यापूर्वी त्यांनी गांभीर्य दाखवलेले बरे, कारण एकदा का वेळ निघून गेली की परतीचा कोणताही मार्ग उरणार नाही आणि त्याचे परिणाम भयानक असतील!, अशा इशारा ट्रम्‍प यांनी दिला आहे. दरम्‍यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री दिलेल्या माहितीनुसार, अमेरिका आणि इराणमध्ये पाकिस्तानमार्फत अप्रत्यक्ष चर्चा सुरू आहे, तर तुर्की आणि इजिप्त देखील मध्यस्थ म्हणून प्रयत्न करत आहेत.

अमेरिकेचा १५ कलमी प्रस्ताव काय आहे?

  • वॉशिंग्टनने मांडलेल्या या प्रस्तावात इराणची लष्करी आणि आण्विक भूमिका बदलण्यासाठी अत्यंत कडक अटी घातल्या आहेत:

  • इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावर कडक निर्बंध.

  • दहशतवादी गटांना मिळणारी मदत बंद करणे.

  • होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा व्यापारासाठी खुली करणे.

  • चर्चेसाठी पोषक वातावरण मिळावे म्हणून एक महिन्याचा युद्धविराम.

  • इराणची क्षेपणास्त्र क्षमता आणि संबंधित लष्करी पायाभूत सुविधा नष्ट करणे.

इराणने या अटी मान्य केल्या, तर अमेरिका इराणवरील निर्बंधांमध्ये अंशतः सवलत देईल. तसेच, इराणच्या बाहेर इंधन सुविधा असलेल्या आणि संयुक्त राष्ट्रांच्या देखरेखीखालील नागरी अणु कार्यक्रमाला परवानगी दिली जाऊ शकते. याशिवाय, कोलमडलेल्या इराणी अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी आर्थिक सहकार्यही देऊ केले आहे.

"अमेरिकेसोबत कोणतीही चर्चा नाही" : इराणची स्‍पष्‍टोक्‍ती

इराणने प्रस्ताव मिळाल्याचे मान्य केले असले तरी, अमेरिकेसोबत थेट चर्चेची शक्यता फेटाळून लावली आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची म्हणाले, "मध्यस्थांमार्फत होणाऱ्या निरोपांच्या देवाणघेवाणीला अधिकृत चर्चा समजू नये. आमचा अमेरिकेसोबत थेट बोलण्याचा कोणताही विचार नाही. अमेरिका आपल्या युद्धाच्या उद्दिष्टांमध्ये अपयशी ठरली आहे. त्यांना झटपट विजय किंवा इराणमधील सत्तापालट करता आलेला नाही."

युद्धाबंदीसाठी इराणच्या ५ अटी

अमेरिकेचा प्रस्ताव नाकारल्यानंतर इराणने स्वतःच्या ५ अटी समोर ठेवल्या आहेत:

  • १. आक्रमक कारवाया पूर्णपणे थांबवणे.

  • २. संघर्ष पुन्हा सुरू होणार नाही याची खात्री/हमी देणे.

  • ३. युद्धातील नुकसानीची भरपाई देणे.

  • ४. सर्व आघाड्यांवरील आणि मित्र गटांवरील हल्ले थांबवणे.

  • ५. होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणच्या सार्वभौमत्वाला मान्यता देणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT