trump threatens iran alive today only to negotiate no cards peace talk
पुढारी ऑनलाईन :
अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये आज शांतता चर्चा होणार आहे. या चर्चेत दोन्ही देश आपापले मुद्दे मांडणार आहेत. चर्चेपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला कडक इशारा दिला असून, इराणकडे कोणताही पर्याय उरलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये आज शांतता चर्चा होणार आहे. दुसरीकडे, चर्चेच्या काही तास आधीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा इराणला धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी दावा केला की, “इराणकडे कोणताही पर्याय नाही आणि तो फक्त चर्चेसाठीच जिवंत आहे.”
ट्रम्प यांनी आपल्या ‘ट्रुथ सोशल’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुज संदर्भात म्हटले की, इराण आंतरराष्ट्रीय जलमार्गांवर नियंत्रण ठेवून जगाकडून जबरदस्तीने वसुली करत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, “इराणी लोकांना कदाचित हे कळत नाही की आंतरराष्ट्रीय जलमार्गांचा वापर करून जगाला घाबरवण्याशिवाय त्यांच्या हातात दुसरे कोणतेही साधन नाही. ते आज जिवंत आहेत, तर ते फक्त चर्चेसाठीच.”
शांतता चर्चा अपयशी ठरल्यास पुन्हा युद्ध सुरू होऊ शकते
दरम्यान, अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस हे आपल्या टीमसह शांतता चर्चेसाठी इस्लामाबादमध्ये पोहोचले आहेत. ट्रम्प यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला दिलेल्या मुलाखतीत संकेत दिले आहेत की, जर ही चर्चा अपयशी ठरली, तर इराणवर पुन्हा हल्ले सुरू होऊ शकतात. त्यांनी सांगितले की, अमेरिकन युद्धनौकांना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सज्ज करण्यात आले आहे आणि त्या हल्ल्यासाठी तयार आहेत.
ट्रम्प यांनी इराणबद्दल बोलताना म्हटले, “आपण अशा लोकांशी व्यवहार करत आहोत ज्यांच्याबद्दल आपल्याला ठाऊक नाही की ते सत्य बोलतात की नाही. ते आमच्यासमोर म्हणतात की ते अण्वस्त्रे संपवत आहेत, आणि मग प्रसारमाध्यमांसमोर जाऊन म्हणतात की त्यांना युरेनियम संवर्धन करायचे आहे.”
ट्रम्प यांच्या मते, इराणमधील लोक लढण्यापेक्षा फेक न्यूज मीडिया आणि पब्लिक रिलेशन्स हाताळण्यात अधिक कुशल आहेत. दरम्यान, अमेरिका-इराण शांतता चर्चेसाठी पाकिस्तान मध्यस्थी करत आहे. इस्लामाबादमध्ये आज इराणी आणि अमेरिकन अधिकारी आमनेसामने येऊन आपापले मुद्दे मांडणार आहेत.