

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत शांततेसाठी 15 मुद्द्यांचा आराखडा चर्चेत असल्याचा दावा केला असला, तरी हा आराखडा प्रत्यक्षात 2025 मधील जुन्या प्रस्तावावर आधारित असल्याचे राजनैतिक सूत्रांचे म्हणणे आहे. मे 2025 मध्ये हा प्रस्ताव मांडण्यात आला होता; मात्र अमेरिकेकडून इराणच्या अणू कार्यक्रमावर हवाई हल्ले झाल्यानंतर या चर्चा कोलमडल्या.
सध्याचा आराखडा फारसा बदललेला नसल्यामुळे अमेरिकेची चर्चांबाबतची गंभीरता संशयात आली आहे. काही तज्ज्ञांच्या मते, ट्रम्प यांनी बाजारपेठ शांत ठेवण्यासाठी आणि प्रगती दाखवण्यासाठी हा दावा केला असू शकतो. त्यांनी इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवरील हल्ले पाच दिवसांसाठी स्थगित करत ‘चांगली प्रगती’ झाल्याचे सांगितले. मात्र, इराणने कोणत्याही थेट चर्चेचा इन्कार केला आहे.
नव्या चर्चांमध्ये पाकिस्तानमध्ये बैठक होण्याची शक्यता असून, पंतप्रधान शाहबाझ शरीफ यांनी यासाठी तयारी दर्शवली आहे; मात्र इराण अमेरिकेकडून भविष्यातील हल्ल्यांपासून हमी मागू शकतो. तसेच होर्मुझ सामुद्रधुनी मधील वाहतुकीचे स्वातंत्र्य हा देखील महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. दरम्यान, काही देशांमध्ये या युद्धावर मतभेद उघड झाले आहेत. फ्रान्स, जर्मनी, इटली, इंग्लंड, कॅनडा आणि जपान यांनी या लष्करी कारवाईला विरोध दर्शवला आहे.
या प्रस्तावात इराणवर कडक निर्बंधांचा समावेश आहे. अणुइंधन साठा देशाबाहेर पाठवणे. युरेनियम समृद्धी 3.67% पर्यंत मर्यादित करणे. अणू केंद्रे निष्क्रिय करणे यांचा समावेश आहे. तसेच निर्बंध शिथिलतेतून मिळणारा निधी क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी वापरता येणार नाही, अशी अटही घालण्यात आली आहे. अमेरिका इराणसाठी नवीन नागरी अणू कार्यक्रमासाठी मदत करेल; मात्र तो आंतरराष्ट्रीय देखरेखीखाली असेल.
मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इराणने अमेरिकेच्या युद्धविराम प्रस्तावावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. इराणी लष्कराच्या ‘खातम अल-अनबिया सेंट्रल हेडक्वार्टर’चे प्रवक्ते लेफ्टनंट कर्नल इब्राहिम झोल्फाघारी यांनी बुधवारी अमेरिकेच्या भूमिकेची खिल्ली उडवली. राज्य दूरचित्रवाणीवर प्रसारित करण्यात आलेल्या पूर्व-रेकॉर्ड केलेल्या व्हिडीओमध्ये झोल्फाघारी यांनी म्हटले की, अमेरिका प्रत्यक्षात इराणशी नव्हे, तर स्वतःशीच चर्चा करत आहे. ज्या रणनीतिक शक्तीचा तुम्ही उल्लेख करत होता, ती आता रणनीतिक अपयशात बदलली आहे, असा टोला त्यांनी लगावला.