Donald Trump Iran ceasefire : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत झालेला अंतरिम शांतता करार आता "संपला" असल्याचे संकेत दिले आहेत. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधील तीन व्यावसायिक जहाजांवर झालेल्या हल्ल्याचा बदला म्हणून अमेरिकेने तेहरानवर नवीन हवाई हल्ले केल्यानंतर काही तासांतच ट्रम्प यांनी हे वक्तव्य केले. तुर्कीमध्ये झालेल्या नाटो (NATO) शिखर परिषदेत बोलताना संतप्त ट्रम्प यांनी इराणी नेत्यांचा 'कचरा' आणि 'मानसिक आजारी लोक' असा उल्लेख केला, तसेच आपल्याला तेहरानसोबत आता कोणताही संवाद साधायचा नसल्याचे स्पष्ट केले.
अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी इराणसोबत स्वाक्षरी झालेल्या सामंजस्य कराराबाबत (MoU) विचारले असता, ट्रम्प यांनी थेट सांगितले, "माझ्यासाठी हा करार आता संपला आहे. मला आता त्यांच्याशी कोणताही संबंध ठेवायचा नाही." ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किमती ३ टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत, मात्र प्रत्यक्षात युद्धभूमीवर याचे काय परिणाम होतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
युद्ध संपवण्यासाठी अंतरिम करारावर स्वाक्षरी करून काहीच आठवडे झाले असताना, अमेरिका आणि इराणला आपला नाजूक युद्धविराम टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. या तणावामागे इराणचा 'स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ'वरील आपला ताबा वापरण्याचा प्रयत्न कारणीभूत आहे. जगातील २०% ऊर्जा पुरवठा (तेल आणि वायू) याच सागरी मार्गातून होतो.
माध्यमांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, "ते कचरा आहेत. ते मानसिकदृष्ट्या आजारी लोक आहेत. ते अत्यंत क्रूर आणि हिंसक आहेत. जर त्यांच्याकडे अणू शस्त्र असते, तर त्यांनी ते नक्कीच वापरले असते. अशा 'मूर्ख' लोकांशी चर्चा करून काहीही साध्य होणार नाही. माझ्या मते, त्यांच्याशी चर्चा करणे म्हणजे केवळ वेळेचा अपव्यय आहे. ते लबाड आहेत."
इराणच्या परराष्ट्र मंत्रालयानेही अशीच भूमिका घेत म्हटले होते की, अमेरिकेच्या कारवायांमुळे "युद्ध संपवण्याच्या करारातील मूलभूत घटक निरर्थक" झाले आहेत.मंगळवारी अमेरिकेने इराणमध्ये मोठ्या प्रमाणावर हल्ले केल्यानंतर या भागातील शांतता पूर्णपणे भंग पावली. अमेरिकेने इराणच्या तेल विक्रीवर पुन्हा एकदा निर्बंध लादले आहेत.
'अॅक्सिओस' (Axios) या वृत्तसंस्थेला एका अमेरिकन अधिकाऱ्याने सांगितले की, ८० हून अधिक लष्करी तळांना लक्ष्य करून करण्यात आलेले हे हल्ले मे महिन्यानंतर इराणवरील सर्वात तीव्र हल्ले होते.इराणमध्ये त्यांचे माजी सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्यासाठी आठवडाभर चाललेला अंत्यसंस्कार सोहळा सुरू असतानाच अमेरिकेने त्यांचे पाळत ठेवणारी यंत्रणा, क्षेपणास्त्र तळ आणि बंदरांवर हल्ले केले. खामेनी हे मार्च महिन्यात अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात मारले गेले होते.मंगळवारी रात्री बंदर अब्बास, सिरिक तसेच क्युशम (Qeshm) बेटावर मोठ्या स्फोटांचे आवाज ऐकू आले.इराणने अमेरिकेचे हे आरोप 'संशयास्पद' म्हटले असले तरी, यापूर्वी त्यांनी जाहीर केले होते की हॉर्मुझमधून केवळ त्यांच्या मंजुरीचा मार्गच सुरक्षित आहे. ट्रॅकिंग तपशिलानुसार, मंगळवारी हल्ला झालेली जहाजे ओमानच्या किनाऱ्याजवळील मार्ग वापरत होती.
दुसरीकडे, इराणने कुवेत आणि बहरीनमधील डझनभर अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करून प्रत्युत्तर दिले. बहरीनमध्ये अमेरिकेच्या नौदलाचा ५ वा ताफा (5th Fleet) तैनात आहे. इराणच्या शक्तिशाली 'रिव्होल्युशनरी गार्ड्स'ने अमेरिकेचे 'MQ-9' ड्रोन पाडल्याचा दावाही केला आहे, परंतु याला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
अमेरिका आणि इराणमधील संघर्षाचा हा भडका उडाल्याने जगाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. गेल्या काही आठवड्यांत दोन्ही बाजूंनी एकमेकांवर लहान-मोठे हल्ले सुरूच होते, परंतु ट्रम्प यांनी युद्धविरामाबाबत केलेले वक्तव्य हे करार स्वाक्षरीनंतरचे सर्वात मोठे आणि निर्णायक विधान आहे.गेल्या आठवड्यातच अमेरिका आणि इराणचे अधिकारी तेहरानच्या अणुकार्यक्रमावर अप्रत्यक्ष चर्चेसाठी कतारला गेले होते. मात्र, आता लागोपाठ घडणाऱ्या या घडामोडींमुळे आधीच क्लिष्ट असलेली ही परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.