US Iran War Tensions
फ्लोरिडा : अमेरिका आणि इस्रायलने २८ फेब्रुवारी रोजी इराणवर हल्ला केला. गेले ११ दिवस सुरू असणाऱ्या या युद्धाचा झळा आता जगभरात पोहोचत आहेत. एकीकडे अमेरिकेच्या हल्ल्यावर तीव्र संताप व्यक्त केला जात असताना फ्लोरिडा येथे आयोजित 'रिपब्लिकन मेंबर्स इश्यूज कॉन्फरन्स'मध्ये बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका लष्करी अधिकाऱ्यासोबत झालेल्या संभाषणाचा किस्सा ऐकवत अमेरिका इराणाला कसा उद्ध्वस्त करत आहे याचा किस्सा सांगितला.
ट्रम्प म्हणाले, "इराणची ड्रोन आणि क्षेपणास्त्र क्षमता पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहे. त्यांचे नौदल आता संपले असून सर्व जहाजे समुद्राच्या तळाला विसावली आहेत. ४६ जहाजे! तुमचा विश्वास बसतोय? खरं तर, मी आमच्या अधिकाऱ्यांवर थोडा नाराज झालो होतो. मी विचारले की ती जहाजे कोणत्या दर्जाची होती? त्यांनी उत्तर दिले, 'उत्कृष्ट आणि अत्याधुनिक'. मग मी विचारले, 'आपण ती पकडून आपल्या फायद्यासाठी का वापरली नाहीत? आपण ती का बुडवली?'"यावर त्या अधिकाऱ्याने दिलेले उत्तर सांगताना ट्रम्प म्हणाले, "तो अधिकारी म्हणाला, 'ती पकडण्यापेक्षा बुडवण्यात जास्त मजा येते'. त्यांना जहाजे बुडवणे जास्त सुरक्षित वाटते आणि मला वाटते ते खरे असावे."
मध्यपूर्वेतील 'दुष्ट प्रवृत्तींचा' नायनाट करण्यासाठी आम्ही ही छोटी 'सहल' काढली आहे आणि ती अल्पकालीन असेल, असेही त्यांनी मिश्किलपणे नमूद केले. शत्रूचा पूर्णपणे पराभव होईपर्यंत अमेरिका शांत बसणार नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून इराणला कडक इशारा दिला आहे. इराणने 'होरमुझच्या सामुद्रधुनी'तून होणारा तेल पुरवठा रोखण्याचा प्रयत्न केला, तर अमेरिकेकडून आतापर्यंत झालेल्या हल्ल्यांच्या तुलनेत २० पट अधिक तीव्रतेने प्रत्युत्तर दिले जाईल, असा इशाराही ट्रम्प यांनी दिला आहे."आम्ही इराणमधील अशा लक्ष्यांचा नायनाट करू की ज्यामुळे इराणला राष्ट्र म्हणून पुन्हा उभे राहणे अशक्य होईल. मृत्यू आणि अग्नीचा वर्षाव त्यांच्यावर होईल. मात्र, अशी वेळ येऊ नये अशी मी प्रार्थना करतो.", असेही ते म्हणाले.
ट्रम्प यांच्या इशाऱ्याला प्रत्युत्तर देताना इराणने म्हटले आहे की, अमेरिका आणि इस्रायलचे हल्ले थांबले नाहीत, तर या भागातून तेलाचा 'एक लिटर' थेंबही बाहेर जाऊ दिला जाणार नाही. युद्धाचा शेवट कधी करायचा ते आम्ही ठरवू," असे इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड्सच्या (IRGC) प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे.