

Iran US Conflict North Korea: अमेरिका मध्य पूर्व आशियात इराणसोबत युद्ध करत असतानाच आता उत्तर कोरियासोबतचा तणाव देखील वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी सोमावारी मोठ्या प्रमाणावर लष्करी कवायती करण्याचा निर्णय घेतला आहे. या लष्करी कवायतींना फ्रीडम शील्ड असं नाव देण्यात आलं आहे. यात दोन्ही देशांचे हजारो सैनिक सामील होणार आहे. ही लष्करी कवायत आज (दि. ९ मार्च) पासून सुरू होईल आणि १९ मार्च पर्यंत चालणार आहे.
दक्षिण कोरियाचे संयुक्त चीफ ऑफ स्टाफ यांनी सांगितलं की फ्रिडम शील्डमध्ये जवळपास १८ हजार कोरियन सैनिक सहभागी होणार आहेत. ही लष्करी कवायत १९ मार्च पर्यंत सुरू राहील. अमेरिकेनं फ्रीडम शील्डमध्ये त्यांचे किती सैनिक सहभागी होणार याची आकडा मात्र दिलेला नाही.
अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या संयुक्त लष्करी कवायतींचे टायमिंग अत्यंत नाजूक आहे. दक्षिण कोरियाच्या माध्यामांमध्ये वॉशिंग्टन त्यांच्या देशात तैनात असलेली काही लष्करी सामुग्री हटवून ती इराण युद्धात वापरण्याची शक्यता वर्तवली जात होती. कोरियात तैनात असलेल्या अमेरिकेच्या लष्कराने लष्करी सामुग्रीच्या विशिष्ट हालचालीवर बोलण्यास नकार दिला. दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी देखील या रिपोर्ट्सवर बोलणं टाळलं. मात्र त्यांनी सहयोगी देशांच्या संयुक्त सुरक्षा रणनितीवर याचा काही परिणाम होणार नाही असं सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार दक्षिण कोरियातील अमेरिकन पॅट्रियट अँटी मिसाईल स्टिस्टम आणि इतर लष्करी उपकरणे ही मध्य पूर्व आशियात हलवण्यात येणार आहेत.
उत्तर कोरियाने दक्षिण कोरिया आणि अमेरिका यांच्या या फ्रीडम शील्ड संयुक्त लष्करी कवायतीला आक्षेप नोंदवला आहे. उत्तर कोरिया या प्रकराच्या लष्करी कवायतींना हल्ल्याची पूर्वतयारी अशा नजरेतून पाहतो. त्यामुळं या भागात आता तणाव वाढण्याची शक्यता आहे. त्यातच जर इराण संघर्षादरम्यान एका जरी उत्तर कोरियाच्या नागरिकाचा मृत्यू झाला तरी उत्तर कोरिया युद्धात उतरेल अशी घोषणा किम जोंग उन यांनी केली होती.
किम जोंग उन यांनी गेल्या महिन्यातच प्योंगायंग मधील एका सभेवेळी दक्षिण कोरियाविरूद्ध कडक भूमिका घेतली होती. मात्र अमेरिकेसोबत चर्चाचा दरवाजा त्यांनी उघडा ठेवला होता. त्यांनी अमेरिकेनं अण्विक निरस्त्रिकरणाची जुनी अट सोडून द्यावी अशी देखील मागणी केली.
२०१९ मध्ये उत्तर कोरिया आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामधील चर्चा निष्फळ झाली होती. त्यानंतर किम जोंग उन यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यासोबतची सर्व चर्चा बंद केली होती. त्यामुळं गेल्या काही वर्षात या दोन देशांमधील तणाव वाढला आहे. किम जोंग उन यांनी युक्रेन संघर्षकाळात रशियाच्या हल्ल्याचा फायदा घेत अण्विक शस्त्रसाठ्याचा वेगाने विकास केला. याचबरोबर रशियासोबतचे लष्करी संबंध देखील अधिक मजबूत केले. युक्रेन युद्धात रशियाला शस्त्र आणि सैन्य देखील पुरवलं. यामुळे रशियाला युक्रेन संघर्षात मदत झाली.