Donald Trump file photo
आंतरराष्ट्रीय

Donald Trump: अमेरिकेतील २२ कोटी मतदारांचा डेटा चीनने चोरला; ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दावा केला की, २०२० मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान चीनने इतिहासातील सर्वात मोठा निवडणूक डेटा चोरी केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे.

पुढारी वृत्तसेवा

Donald Trump

नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी दावा केला की, २०२० मधील अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीदरम्यान चीनने इतिहासातील सर्वात मोठा निवडणूक डेटा चोरी केल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला आहे. चीनने बेकायदेशीरपणे तब्बल २२ कोटी अमेरिकन मतदारांची गोपनीय माहिती हस्तगत केल्याचे त्यांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या निवडणूक यंत्रणेतील त्रुटी उघड करणारे गुप्तचर विभागाचे अत्यंत संवेदनशील दस्तऐवज तात्काळ सार्वजनिक करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.

२२ कोटी मतदारांची माहिती चोरीला

व्हाईट हाऊसमधून सुमारे २५ मिनिटांच्या थेट प्रक्षेपणात ट्रम्प यांनी चीनवर निशाणा साधला. ते म्हणाले, "आज रात्री मी अशा काही गुप्तचर दस्तऐवजांना सार्वजनिक करत आहे, जे आपल्या निवडणूक प्रणालीतील गंभीर त्रुटी समोर आणतील. २०२० च्या निवडणूक काळापासून चीनने अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी डेटा चोरी केली आहे. यामध्ये २२ कोटी मतदारांची नावे, पत्ते, फोन नंबर आणि राजकीय पक्षांशी संबंधित वैयक्तिक माहिती चीनने बेकायदेशीरपणे मिळवली आहे." या माहितीचा वापर मतदारांची बनावट नोंदणी किंवा इतर गैरकृत्यांसाठी केला जाऊ शकतो, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

आपल्या भाषणात ट्रम्प यांनी प्रशासनातील काही उच्चपदस्थांवर (डीप स्टेट) निशाणा साधला. अमेरिकेची निवडणूक यंत्रणा हॅकिंग आणि परकीय हस्तक्षेपासाठी अत्यंत असुरक्षित असल्याचे हे दस्तऐवज सिद्ध करतात, असा दावा करत ट्रम्प म्हणाले, "अतिशय चिंताजनक बाब म्हणजे ही महत्त्वाची माहिती अनेक वर्षांपासून अमेरिकन जनतेपासून लपवून ठेवली गेली होती." देशातील सध्याची निवडणूक प्रणाली पारदर्शक आणि निष्पक्ष निवडणुका घेण्यास पूर्णपणे अपयशी ठरल्याचेही ते म्हणाले.

रशिया, चीन, इराणकडून धोका

ट्रम्प यांनी एका गुप्तचर अहवालाचा हवाला देत सांगितले की, रशिया, चीन, इराण, उत्तर कोरिया आणि काही आंतरराष्ट्रीय टोळ्या अमेरिकेच्या निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्याची क्षमता ठेवतात. या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश आपण 'डायरेक्टर ऑफ नॅशनल इंटेलिजन्स' (DNI) आणि 'एफबीआय' (FBI) ला दिले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, काँग्रेसमधील रिपब्लिकन खासदारांनी मतदारांची ओळख पटवण्यासाठी आणि नागरिकत्वाच्या अटी कडक करण्यासाठी नवीन कायदा करावा, यावर त्यांनी भर दिला.

चीनने अमेरिकन मतदारांचा डेटा गोळा केल्याचे आरोप नवीन नाहीत. २०२२ मध्ये सार्वजनिक झालेल्या सायबर इंटेलिजन्सच्या एका अहवालानुसार, चिनी गुप्तचरांनी अमेरिकेतील काही राज्यांच्या मतदार डेटाचे केवळ 'जनमत विश्लेषणासाठी' (Public Opinion Analysis) निरीक्षण केले होते.

दुसरीकडे, २०२० च्या निवडणुकीनंतर ट्रम्प आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात दाखल केलेले सर्व खटले फेटाळण्यात आले होते, कारण ते निवडणुकीच्या निकालावर परिणाम करेल असा कोणताही घोटाळा सिद्ध करू शकले नव्हते. ट्रम्प यांच्या स्वतःच्याच न्याय मंत्रालयाने (Justice Department) आणि विविध तपासण्यांमध्ये निवडणुकीत कोणताही व्यापक गैरप्रकार किंवा डेटा चोरी झाली नसल्याचे आधीच स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT